श्रीगायत्री मंत्र

पांडवांचा जेष्ठ बंधु युधिष्ठिर अर्थात धर्मराजा, पारमार्थिक साधनेसाठी भिष्माचार्यांकडून मार्गदर्शन करून घेत असता, त्यांना प्रश्न विचारतो, कोणत्या मंत्राने मनाची शांती, भीतीचा नाश, शत्रूनाश आणि संरक्षण होऊ शकेल? यावर भीष्माचार्य म्हणाले, सर्व प्राणिमात्रांचे व्यवहार एकमात्र गायत्री शक्तीवर अवलंबून आहेत. जिथे गायत्री मंत्राचा जप चालू असेल ते वातावरण सामर्थ्यशाली बनते. गायत्री मंत्र, वेदातील पवित्र मंत्र मानला जातो. कारण गायत्री ही ज्ञानाची देवता आहे. ज्यात आपल्या बुध्दीला प्रेरणा लाभावी म्हणून सुर्याजवळ बुध्दीच्या निर्मितेची अनन्य भावाने प्रार्थना केली आहे. आणि गायत्री म्हणजेच साक्षात तेज आहे. सर्व वेदांनी एकमुखाने गायत्रीची उपासना सांगितलेली आहे. सर्व शक्तींचा समावेश गायत्री मंत्रात असल्याने गायत्रीची उपासना करणा-यांना आणखी कोणत्याही निराळया उपासनेची गरज नाही.

  • ॐ भुर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धिमही धियो यो न: प्रचोदयात्।। असा चोविस अक्षरांचा हा मंत्र म्हणताच, संपूर्ण शरीर आंदोलित होते. या मंत्राच्या चोवीस अक्षरांनी शरीरात असलेली चोवीस प्रसुप्त शक्तीकेंद्रे जागृत होऊन एक अवर्णनीय आनंद मिळतो. गायत्री मंत्र म्हणताना ॐ हा प्रत्येक वेळी म्हणण्याची आवश्यकता आहे.
  • ॐ भुर्भुव: स्व: या तीन शब्दांना याहृती (उच्चार) असे म्हणतात. या तीन शब्दांत ज्ञान, कर्म आणि भक्ति समाविष्ठ आहे.
  • भु: – प्राण आणि पृथ्वी होत. पृथ्वीच्या अणुरेणूत प्राणशक्तीरूपी परमेश्वर भरलेला आहे.
  • भुव: – सूर्य, चंद्र आणि अगणित ताऱ्यांनी भरलेले अंतरिक्ष. जे आपले सवांर्वचे रक्षण करीत आहेत.
  • स्व: – सुख देणारा अर्थात स्वर्ग म्हणजेच सुखसमृध्दी प्राप्त व्हावी. थोडक्यात भु: भुव: स्व: म्हणजे भुमि, अंतरिक्ष आणि द्युलोक असे तीन लोक या ब्रम्हांडात असून त्यांच्या अग्नि, वायु व सूर्य या देवता आहेत.
  • ॐ भु: भूर्भुव: स्व: नंतर ॐ भू: भूव: स्व: मह: जन: तप: सत्यम या सात व्याहृती (उच्चार) प्राणायाम करून म्हणण्याची शास्त्रॊक्त पध्दती आहे. तद्नंतर गायत्री मंत्र पठण केला जातो.
  • ॐ तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धिमही । धियो यो न: प्रचोदयात ।। जो सुर्य आमच्या बुध्दीला प्रेरणा देतो त्याच्या सर्वश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो. ते तेज आमच्या बुध्दीला श्रेष्ठ कार्य करण्याची प्रेरणा देते. अर्थात पृथ्वी, अंतरीक्ष व स्वर्ग या तीन लोकांना प्रकाशमय करणा-या तेजाने आमचे जीवन उजळून जाऊन दिव्यतत्व प्राप्त होवो. अशी प्रार्थना असलेला गायत्री मंत्र आहे. ह्याने मन, वाणी, शरीर, परिसर शुध्द होतात.

सूर्य देवतेची उपासना फार काळापासून चालत आलेली आहे. सूर्य उपासनेत गायत्री मंत्रच अत्यंत प्रभावी आहे. हा मंत्र म्हणजेच सूर्याची केलेली महत् गौरवपूर्ण स्तुती आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्व मंगलात मंगल, सर्व पापांचा, सर्व रोगांचा समूळ नाश करणारी आणि आयुष्याची वृध्दी करणारी सर्व श्रेष्ठ अशी सुर्याची उपासना आहे. ती गायत्री मंत्रात आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, गायत्री मंत्र हा सद्बुध्दी देणारा मंत्र आहे. या मंत्राच्या उपासनेने सन्मार्गाचा लाभ होऊन सत्कर्मे आपोआप होतात. लोकमान्य टिळकांचे उद्गार असे आहेत, श्रेष्ठ मार्गाने जाण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य फक्त गायत्री मंत्रात आहे. त्याच्या साधनेने सद्सद्विवेक बुध्दी प्राप्त होते.

गायत्री मंत्राच्या उपासनेने सर्व प्रकारची विघ्ने नाहिशी होऊन महादारिद्रय दूर होते. दृष्टीदोष नाहिसे होऊन दीर्घ दृष्टी प्राप्त होते. कोडासारखे रोगही नष्ट होतात. याचं उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब! एकदा दुर्वास मुनींना हसला तेव्हा त्यांनी सांबाला क्रोधाने तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. दूर्वासांचा शाप, सांब कुष्ठरोगी झाला. परंतु कृष्णाच्या मार्गदर्शनाने सांबाने चंद्रभागेच्या तीरावर बसून उग्र सूर्य उपासना (गायत्री मंत्राचा जप) केली आणि त्याचा कुष्ठरोग नाहिसा झाला. गायत्री मंत्र मानवाच्या कल्याणासाठी आहे. मानवी जीवन समृध्द करणारा आहे. सर्व देवतांची तेजे गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षरात समाविष्ठ आहेत. त्या प्रत्येक अक्षराच्या उच्चाराने आपल्या शरीरात ती तेजे जागृत होतात. शरीर ताजेतवाने, प्रफुल्लीत राहतेच शिवाय मनही स्वच्छ होऊन हृदयात परमेश्वराचे अस्तित्व कायम होऊन जाते. आदिमाता गायत्री देवी नित्य गायत्री मंत्र केल्याने भाळी (ललाटी) आणि चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज आणि आकर्षण निर्माण होऊन वाचा प्रभावी बनते. मनोवृत्तीत शुध्दता येऊन वाईट विचारांपासून सुटका होते. ज्या ठिकाणी गायत्री मंत्र केला जातो त्याच्या आसपास, सगळीकडे शांतता, पावित्र्य नांदू लागते. त्या ठिकाणी येणाऱ्यांची मती, अंत:करण शुध्द होते. गायत्री मंत्राने संसारी जीवनही उजळून जाऊन अनेक प्रकारचे लाभ मिळतातच शिवाय जे काही हेतू, मानस असतात ते ही सफल होतात. आत्मबल वाढून ज्ञान प्राप्तीकडे मानव वाटचाल करू लागतो. कारण गायत्री देवी ज्ञान व बुध्दी त्याचप्रमाणे आत्मबलाची अधिष्ठात्री, वेदांची माता आणि प्रत्यक्ष ईश्वराची शक्तिरूप सहचारीणी आहे. या झाल्या संसारी व पारमार्थिक गोष्टी. इतकंच काय सरपटणारे विषारी प्राणी अर्थात साप, विंचू अथावा मधमाशी इ. प्राणी चावले असतील, त्यांचे विषही गायत्री मंत्राने नाहिसे होते. परंतु यासाठी तो साधकहि तितकाच श्रेष्ठ असावयास हवा. कारण गायत्री मंत्र योग्य प्रकारे सिध्द झालेल्या हवा.

गायत्री मंत्र हा २४ अक्षरांपासून बनलेला आहे. प्रत्येक अक्षर हे दैवी शक्तीचं बीज आहे. प्रत्येक अक्षरात एक एक देवता वसलेली आहे. जो या मंत्राचा नित्य जप (साधना) करतो त्याला २४ दैवी शक्तींचा लाभ होतो. त्याचप्रमाणे गायत्रीचे ऋषीही २४ मानले गेले आहे. त्यांची भक्ती, तपश्चर्या, साधना इ. शक्ती गायत्रीत एकत्र करून या महामंत्राची रचना करण्यात आली आहे.

  • ॐ भूर्भुव: स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं ॐ भर्गो देवस्य धीमही ॐ धियो यो न: प्रचोदयात ॐ
  • गायत्री मंत्राची तीन पदे होतात :- १) तत्सवितुर्वरेण्यं   २) भर्गो देवस्य धीमही आणि ३) धीयो यो न: प्रचोदयात
  • धर्मशास्त्र, पुराण तसेच इतिहासात सांगितले आहे गायत्रीचा पंचप्रणवयुक्त जप वरील प्रमाणे करावा.
  • प्रथम ॐ काराचा उच्चार करावा, नंतर भूर्भूव: स्व: चे उच्चारण करून पुन्हा ॐ कार भर्गो देवस्य धीमही पुन्हा ॐ कार धीयो यो न: प्रचोदयात आणि पुन्हा ॐ कार.
  • गायत्रीचे २४ ऋषी : वामदेव, अत्रि, वशिष्ठ, शुक, कण्व, पराशर, विश्वामित्र, कपिल, शौनक, याज्ञवल्क्य, भारद्वाज, जमदग्नी, गौतम, मुदगल, वेदव्यास, लोमश, अगस्त्य, कौशिक, वरदा, पुलस्त्य, माण्डुक, दुर्वास, नारद आणि कश्यप.
  • त्याचप्रमाणे २४ अक्षरांच्या २४ देवता. प्रत्येक अक्षरांचा एक स्वतंत्र छंद आहे. ह्या प्रत्येक छंदाची एक देवता आहे.

आपल्या विद्वान ऋषी-मुनींनी गायत्री मंत्राचा केवढा गहन शोध लावला आहे की ज्याने अनेक देवतांची शक्ती जपकर्त्याला प्राप्त होत असते. त्याद्वारे जीवनात प्रत्येक टप्प्यावर यश मिळून प्रगतिच्या दिशेने अलौकिक वाटचाल मानव करू शकतो. गायत्री मंत्राची उपासना, साधना करून अनेक सत्पुरूषांनी महान शक्ती प्राप्त करून घेतली होती. त्याचा उपयोग त्यांनी फक्त जनकल्याणासाठीच केला. त्याचा चुकुनही दुरूपयोग त्यांच्या हातून झाला नाही. बडोद्याच्या मंजूसर गावामध्ये श्री मुकुटराम महाराज होते. त्यांनी गायत्रीची उपासना करून सिध्दी प्राप्त केली होती. त्यांचे शिक्षण जेमतेम दुसरी पास! परंतु केवळ गायत्री उपासनेमुळे त्यांना जगातील सर्व भाषा अवगत झाल्या होत्या. इतकंच काय तर योग, ज्योतिष, धर्मशास्त्र इत्यादी अनेक विषयांचे ते पंडित झाले होते. नगराईतील राम टेकडीजवळील घनदाट अरण्यात `हरिहर बाबा’ यांनीही गायत्री मंत्रांची साधना करून सिध्दी प्राप्त केली होती. सर्व परिसर गायत्री शक्तीने व्यापून राहिला होता. ते जंगलात एका छोटया झोपडीत रहात असत. त्यांच्या दर्शनाला जायचे म्हटले तर घनदाट जंगलातून. त्यातही भीती असायची ती हिंस्त्र श्वापदांची. जाताना वाटेत सिंह, वाघ यांची भेट ही नक्की ठरलेली. ते समोर येणारच! अशा वेळी त्या माणसाने म्हटले, मी हरीहर बाबांच्या दर्शनाला जात आहे, की ते वाघ, सिंह शांतपणे जंगलातून निघून जाऊन त्या माणसाला वाट मोकळी करून देत असत. असा हा गायत्री उपासनेचा चमत्कार!

कोणतीही गोष्ट साध्य वा प्राप्त होण्यासाठी आपले शरीर उत्तम असावयास हवे. त्यातही आपण ज्या देवतेची आराधना, उपासना करू लागतो तेव्हा ती देवता सुक्ष्म रूपाने आपल्या देहात प्रवेश करीत असते. गायत्री मंत्र वा गायत्री उपासना ही तेजाची उपासना मानली जाते. गायत्री ही सवितादेवतेची उपासना होय. रोज दर्शन देणाऱ्या सूर्यनारायणाला सवितादेवी तेज पुरविते. येथे समजून घ्यायला हवे की गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे. परंतु उपासना ही सवितादेवीची होत असते. यामध्ये सूर्यनारायण व सवितादेवी या दोघांचीही आराधना मंत्रांद्वारे आपल्याकडून होत असते. कारण गायत्री मंत्र म्हटल्यानंतर आपण सूर्याची १२ नावे घेऊन मंत्राची सांगता करीत असतो. त्याबरोबर १२ सूर्यनमस्कार घालायाचे असतात. यामुळे शरीर शुध्दी होत असते. शरीर शुध्दी बरोबरच मनाचीही शुध्दी महत्वाची असते. गीता सांगते; मन हे सहावे इंद्रिय आहे. इतर इंद्रियांना आपण योग शास्त्राने संयमित ठेवू शकतो. मग मनाला का नाही? पटकन ते शक्य होत नाही; परंतु हळूहळू करू शकतो. गायत्री उपासनेमुळे ऐहिक सुख (नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामध्ये यश, उत्तम संतती) मिळतेच, शिवाय आध्यात्मिक प्रगती, पारमार्थिक शक्ती ही प्राप्त होते.

  • जप करण्याची पध्दती : वाचिक (मोठयाने म्हणणे), उपांशु (फक्त आपल्यालाच ऐकु येईल) आणि मानसिक. याचे दोन प्रकार अ) मनातल्या मनात ब) मनातल्या मनात पण तोंडाची व जीभेची हालचाल न होऊ देता.
  • ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, मरीची, अत्री, अगस्ती, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वशिष्ठ होत. त्यांनी ब्रह्माला विनंती केली की `सत्य’ हे काय आहे? तेव्हा ब्रह्मदेवाने “ॐ तत् सत्”असा निर्देश केला.

ओम कार हा सकल सृष्टीत व्यापून आहे. त्याचा शोध घ्या. जे तेज दिसेल तेच `सत्य’ होय. पुढे त्यांना आणखी सतरा  ऋषी येऊन मिळाले. असे २४ जण ध्यानामध्ये `ॐ तत् सत’ चा अभ्यास करू लागले. सर्वांना त्यातून अनेक प्रकारची स्पंदने जाणवू लागली. अनेक दिव्य अनुभूती येऊ लागल्या. अशा तऱ्हेने २४ ऋषींना २४ अक्षरे सापडली म्हणजे २४ अक्षरांची जुळणी झाली. ह्या २४ अक्षरांचा समुदायालाच त्यांनी `गायत्री मंत्र’ असे नांव दिले. (यात विश्वामित्रांचा वाटा मोठा आहे. म्हणून गायत्री मंत्राचा कर्ता व ऋषी म्हणून विश्वामित्र ऋषींचं नाव घेतले जाते.)

  • गायत्री उपासना म्हणजे सत्वगुणाची वृध्दी होय. तिची शाखा `माधवी’ शक्ती! ही आपल्या गुणात परिवर्तन करते. म्हणजेच तमोगुणाकडून रजोगुणाकडे आणि रजोगुणाकडून सत्वगुणाकडे!
  • गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षरांच्या अभ्यासातून वेद प्रकट झाले. प्रथम एकच वेद होता. परंतु कालमानाप्रमाणे त्याच्या गुणकर्म विभागानुसार भाग करणे आवश्यक ठरले. महर्षी व्यासांनी ह्या वेदाच्या सुमारे एक लक्ष श्रुतींचे विभाजन केले.
    • ८० हजार श्रुती ऋग्वेदात
    • १६ हजार श्रुती यजुर्वेदांत
    • ४ हजार श्रुती सामवेदात

विभागून तीन वेदांची रचना केली. त्यातून जे ज्ञान उरले त्याचा अथर्ववेद तयार झाला. अथर्व हा व्यापार विषयी असल्याने ह्या धन, वैभव, वस्तुसंग्रह, औषधी, अन्न, धातू, गृह, शास्त्र, वाहन वगैरे प्राप्तीसाठी काय करावयास हवे त्याचे ज्ञान सांगितले आहे. ह्या चार वेदांना ब्रह्माची चार तोंडे (मुखे) मानली जातात. चार तोंडे म्हणजे चार दिशा. दिशा अर्थात मार्ग होय.

  • ऋग्वेदाचे कार्य कल्याण त्यातून धर्माची प्राप्ती होते.
  • यजुर्वेदाचे कार्य पौरूष त्यातून मोक्षाची प्राप्ती होते.
  • सामवेदाचे कार्य क्रिडा त्यातून कामाची प्राप्ती होते.
  • अथर्ववेदाचे कार्य अर्थ त्यातून अर्थाची प्राप्ती होते.

गायत्री मंत्रात विनायकी शक्तीहि समावलेली आहे. विनायक म्हणजे गणपती. मग गणपती आणि सवितादेवी (गायत्री) यांचा काय संबंध? असा प्रश्न उभा राहतो? श्रीगणेश पुराण सांगते, गणपतीने १८ वर्षापर्यंत २१ कोटी गायत्री जप आणि तिन्ही वेदांचा अभ्यास पूर्ण केला होता. जरी ५ व्या वर्षानंतर सुरूवात केली तर १३ वर्षांत २१ कोटी जप गणेशाने कसा केला असेल? ते कसे शक्य आहे? उत्तर आहे – परावाणीने! वाणीचे ४ प्रकार, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा.

  • वैखरी म्हणजे मोठयाने केलेला जप – फल प्राप्ती एक पट
  • मध्यमा म्हणजे खालच्या आवाजात – फल प्राप्ती दुप्पट
  • पश्यंती (उपांशुने) आपल्यालाच ऐकू येणे – फलप्राप्ती तिप्पट
  • परावाणी – मनात – ओठ व जीभ न हलवता – फलप्राप्ती चौपट

जेव्हा परावाणीने जप करतो त्यावेळेस त्याची संख्या चौपट धरली जाते. पुढे हाच जप अजपाजप पध्दतीने होतो. किती? आपला श्वासोच्छवास दिवसाला (२१६००) होतो, तितका (२६००) जप दिवसाला होतो. श्रीगणेशाने २१ कोटी गायत्री जप केला आणि तिच्या आशिर्वादाने गजानन सिध्द देवता झाली. त्याची विनायकी शक्ती गायत्री जप करणाऱ्यास प्राप्त होते. विनायकी म्हणजे नेतृत्व शक्ती. दृष्टांचा नाश करणारी शक्ती, प्रसाद प्राप्त करून देणारी शक्ती, सदैव मंगल चिंतणारी शक्ती. हे सर्व गुण गणपतीमध्ये असल्याने ते आपणांस प्राप्त होतात. गायत्री मंत्रामध्ये (जप करण्यामध्ये) विविधता आहे.

  • ॐ भू भुव: स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो: न: प्रचोदयात्। हा एक प्रकार. यामध्ये मंत्राच्या सुरूवातीस ॐ उच्चारून सकल मंत्र म्हणण्याच्या प्रकाराला `एकपाद’ पध्दत म्हणतात. मंत्रातील सर्व अक्षरे मात्र बरोबर उच्चारली जावीत. ह्याने मधुमेह रोग नष्ट होतो. (एका मिनिटात २१ वेळा) जलदगतीने म्हणावा.
  • ॐ भू भुव: स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो: न: प्रचोदयात् ॐ ।। हा दुसरा प्रकार होय. येथे सुरवातीला ॐ दीर्घ म्हणावा व शेवटचा ॐ ऱ्हस्व म्हणावा. ह्याला `संपुट’ असं म्हणतात. ह्याने बुध्दीमत्ता तीव्र होऊन मेंदूचे रोग नष्ट होतात. (एका मिनीटाला १२ वेळा म्हणावा)
  • ॐ भू भुव: स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ॐ धियो यो: न: प्रचोदयात्।। ह्या तिसऱ्या प्रकारात प्रत्येक ॐ दिर्घ स्वरात उच्चारून मंत्र म्हणावा. ह्याने आध्यात्मिक प्रगती झपाटयाने होऊन श्रेष्ठत्व प्राप्त होते. ह्या प्रकाराला `त्रिपाद’ म्हणतात. (एका मिनीटात 10 वेळा म्हणावा.)
  • ॐ भू ओम भुव: ॐ स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य ॐ धीमहि धियो यो: न: प्रचोदयात् ।। ह्याला `पंचपाद’ म्हणतात. ह्याने ह्दयाचे रोग पूर्णपणे बरे होतात. (10 सेकंदात संपूर्ण मंत्र म्हणावा.)
  • ॐ भू ॐ भुव: ॐ स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं ॐ भर्गो देवस्य ॐ धीमहि धियो यो: न: प्रचोदयात् ।। ह्याला `षडपाद’ असं म्हणतात. ह्याने लौकिक उन्नती पटकन होते. (१२ सेकंदात म्हणावा.) ह्याने रक्तदाब, दमा इ. रोग नष्ट होतात.

गायत्री या एका मंत्राने (नित्य पठण केल्यास) आपल्यावर येणारी अरिष्टे, दु:खे निराकरण होतात. शारीरिक रोग नष्ट होतातच शिवाय उत्तम आरोग्य प्राप्त होते. मानसिक चिंता, क्लेश दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारते. महापातके नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सदैव सुख-समृध्दी आणि शांती लाभते.