
या विश्वाचि निर्मिति एका मोठ्या स्फोटातुन झाली. अस शास्त्रज्ञ मानतात. मैत्रेय ऋषीनीही हेच मांडलं. या स्फोटाच्या वेळी मोठा ओंकार झाला असे मत पूर्वापार रूढ आहे. त्या वेळी नक्की काय घडल हे कळण्यासाठी शास्त्रज्ञ तसाच स्फोट करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऋषीमुनींनी ओंकाराचे सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. त्याकाळी ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग साधनेतून जात होता. कोणतीही उपकरण वापलेली जात नव्हती. ओंकारातून ब्रम्हा विष्णु महेश या तीन देवतांचा, तत्वांचा उगम झाला अस मानलं जातं. अनुक्रमे याचा अर्थ निर्माणकर्ता, पालनकर्ता, विनाश कर्ता असे या तीन तत्वाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ज्या ओंकारातून या तत्वांची निर्मिती झाली त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. तत्वचिंतनातून ऋषीमुनींनी ओंकार साधना संकलित केली. भारतीय आध्यात्मिक साधना उच्चार शास्त्रावर अवलंबून आहे. प्रत्येक योग साधनेत ओंकार केला जातो.ओंकाराच्या म्हणण्याच्या विविध पद्धती आहेत. प्रत्येक पद्धती प्रमाणे त्याचे परिणामही वेगवेगळे आहेत. योगसाधनेत चक्र जागृतीसाठी ओंकार केला जातो.
गर्भात असताना मुलाचं पोषण नाभीद्वारे केलं जातं. मातेशी जोडलेल्या नाळेतून अन्नरस बाळाला मिळत असतो. जे शुध्द आहे योग्य आहे तेच बाळाला मिळत असते. जणू काहि ते बाळ मूळ तत्वांशी जोडले गेलेले असते. जन्मानंतर ती नाळ कापली जाते व त्याचे मुळतत्वांशी विलगिकरण होते. या नाभिला दशमद्वार म्हटले गेले आहे. जे जन्मानंतर बंद झालेले असते. नाभिच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे. ज्या विश्वाशी आपला संबंध तोडला गेला आहे. त्याच्याशी पुन्हा जोडण्याचे कार्य मणिपूर चक्र करते, याला मणिपूर साधना म्हणतात. म्हणूनच या चक्राला वेगळे महत्व आहे. अध्यात्माच्या भाषेंत देवाने मानवाला साधना करण्यासाठी चार वाणीचे दान दिले आहे.
- वैखरी – मौखिक बोलीतून जे बोलले जाते,जे समोरच्याला ऐकायला येते, ती वैखरी
- पश्यन्ति – ओठांची हालचाल करून जे फक्त स्वत:ला ऐकू येईल त्या वाणीला पश्यन्ति वाणी म्हणतात.
- मध्यमा – मनातल्या मनात देवाचे नाव घेतले जाते ती मध्यमा वाणी.
- परावणी – साधनेने ही वाणी जागृत होते. ज्या वाणीत आपला आत्माच स्वतः जप करू लागतो. ज्याला अजपाजप म्हणतात.
या बाबतीत कबीर म्हणतात. “हम बैठे आराम जप करे राम” या वाणीचा उगमही मणिपूर चक्रातून होतो. मणिपूर चक्रजागृती ओंकार साधनेतुन होते, ।। परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर।। असे विसोबा खेचर, ज्यांनी नामदेवाला अनुग्रह दिला, ते आपल्या अभंगात म्हणतात. हे जे परा वाणीचे घर आहे, संबोधले आहे ते मणिपूर चक्राशी संबंधित आहे. नाभीशी संबंधित आहे. येथूनच जीव शिव ऐक्य होण्याचा मार्ग मोकळा होतो. मणिपूर चक्र जागृत करून आपल्या नाभीद्वारे वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरात खेचून घेणे हे ओंकार साधनेच मूळ आहे. ग्रहण केलेली ऊर्जा आपल्या सर्व चक्रात व नाड्यांमध्ये कुंडलीनि मध्ये प्रवाहित करणे हा पुढचा भाग आहे. वैश्विक ऊर्जा मणिपूर चक्राद्वारे घेऊन आपल्या शरिरातील शक्ती शतपटीने वाढवणे व विहित कार्यासाठी त्याचा वापर करणे हा या साधनेचा मूळ गाभा आहे.
योगायोग पहा कसा आहे तो मातेच्या उदरात याच नाभीद्वारे आपलं पोषण होत असते व पुढे जाऊन स्वतः ची ओळख व्हावी यासाठी साधनेच्या मार्गाने याच मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न आपण करतो. “साधना महत्वाची” अस टेम्बे स्वामी म्हणतात. भाऊ महारजांकडे साधनेच कोठार होत. अनेक साधना त्यांनी केल्या होत्या. परंतु आपल्या शिष्याना त्यांनी सहज जमतील अशा साधना शिकवल्या. त्यातील एक म्हणजे ओंकार साधना. वेगळ्या पद्धतीचा खर्जातील ओंकार शिकवला ज्यायोगे मणिपुरचक्र जागृत होते. परा वाणीचा प्रवास सुरु होतो. भाऊंनी आपल्या शिष्याना साधनेच्या विविध अविष्काराची ओळख करून दिली. आपला शिष्य साधनेत कुठेही कमी पडू नये तसेच कोणालाही सहज करता यावी अशा सहजोग साधनेची दालनं सर्वांसाठी खुली केली.