
ब्रम्हांडी ते पिंडी, या उक्तीप्रमाणे निसर्गा मध्ये जे काही ज्ञान आहे ते सर्व अव्यक्त स्वरूपात प्रत्येकाच्या शरीरामध्ये अंतर्भूत आहे. याची ओळख प्राचीन भारतीय संस्कृती मधील ऋषींना आधीच झाली होती. खरे पाहायला गेलं तर हे ऋषी खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञच होते. त्यांनीच विविधअंगी अभ्यास करून मंत्रशास्त्र, मानसशास्त्र, योगशास्त्र, कामशास्त्र, खगोलशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, इ अनेक शास्त्रचा शोध लावून हे ज्ञान, सामान्य माणसाच्या परिभाषेत बसवुन दिले. ध्यान – धारणा – समाधी या त्रयीचा शोध लावला. यातूनच सूक्ष्म देह धारणा, आणि पंचतत्वांची सांगड घातली गेली. या भूतलावरील प्रत्येक गोष्ट पंचतत्वांच्या नियमांनुसारच तयार झाली आहे. हा सर्व सिध्दांताचा मूळ पाया झाला. याचा खोलवर अभ्यास केला ही एक गोष्ट सहज ध्यानात येते की भारत त्या काळात ज्ञानाची सुवर्णभूमी असणार यात तिळमात्र शंका नाही. अग्नी, वायू, जल, आकाश आणि भु म्हणजेच पृथ्वी ही पंचतत्व आहेत. यांच्यामधून सृष्टीची निर्मिती झाली. याच सर्व गोष्टी मानवी शरीरामध्ये सुद्धा आहेत. यातील प्रत्येक एक तत्व शरीरातील पंचप्राणाशी संबंधित आहे. ज्यावेळी शरीरातील पंचतत्वामध्ये काही असंतुलितपणा येतो त्यावेळी त्याच्याशी संबंधित प्राण बिघडतो आणि आपण आजारी पडतो. हा प्राण आपल्याला साधनेच्या मदतीने सुरळीत करून पुनः त्याठिकाणी जोडता येतो. साईबाबांना ज्यावेळी दम्याचा त्रास होऊ लागला त्यावेळी तीन दिवसासाठी आपला प्राण ब्रम्हांडी चढविला होता योगसमाधीत त्यांनी आपला दमा बरा केला. माणिकप्रभूंनीही, त्यांना ज्यावेळी आतड्याचा कर्करोग झाला होता, त्यावेळी तो बाहेर काढून, स्वच्छ करून, आपलं आयुष्यमान वाढवले होते. शंकराचार्यानी सूक्ष्म देहाचा वापर करून मंडणमिश्रानी विचारलेल्या प्रश्नांची, अनुभव घेऊन उत्तरे दिली आणि प्रश्नोत्तराची स्पर्धा जिंकली होती. ही नाथपंथीय साधना आहे. जी निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वर महाराजांकडे आली. त्यापूर्वी एक गुरू एक शिष्य ही पध्दत होती. ज्ञानेश्वरानी ही साधना सामान्य माणसासाठी खुली केली. पुढे गुरू-शिष्य परंपरेतून ती प्रवाहित होत होत जिजाबाईंचे गुरू गुंडा महाराज यांच्या कडून जिजाऊंना प्राप्त झाली. आणि त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला आला.

हे ज्ञान मुळात भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. पण काही कालांतराने हळूहळू हे ज्ञान आपल्याकडून लोप होत गेलं. आणि पाश्चिमात्य लोकांनी त्याचा अभ्यास करून अंगीकारले. याच्या अनेक पायऱ्या आहेत. ज्ञान कर्म आणि भक्ती याचा मेळ घालून हळूहळू ही साधना विकसीत होत जाते. माणसातल्या षड्रिपुंचा नाश होतो आणि जिवाशिवाची अतुल्य भेट घडते. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर विठ्ठला भेटाया गेलो, विठ्ठलची होऊनि ठेलो. ही पध्दती जेवढी सोपी वाटते, तेवढी सोपीही नाही आहे. साईसच्चरित्रामध्ये, एक सधन इसम साईबाबांना भेटायला येतो. त्याचा विचार असतो, आपल्यासमोर सर्व सुखे हात जोडून उभी आहेत. आता आपल्याला फक्त ब्रह्म मिळाले की आपल्या जीवनाची सोय झाली. ब्रह्मसिद्धीच्या हेतूने तो बाबांना भेटायला येतो. त्या माणसासमोर, बाबा एका लहान मुलाला विविध जागी पाठवून केवळ पाच रुपये आणावयास सांगतात. मुलगा सर्वांकडून निराश होऊन येतो. शेवटी साईबाबच ते, त्यांनी आधीच ताडलेलं असत. त्यावेळी त्या व्यक्तीच्या खिशात शंभर रूपयाचे पुडके असते. पण त्यातील पाच रुपये काढून बाबांना द्यायची इच्छा होत नाही. आणि ते बाबाना घाई करून लवकर ब्रह्म दाखवायला सांगतात कारण त्यांना परत जायाची घाईसुद्धा असते. बाबा त्यांना म्हणतात, जोपर्यंत तुमच्या मनात लोभ आहे, षड्रिपु आहेत, तोपर्यंत तुम्हाला ब्रह्म दिसणे शक्य नाही. चंदनाचे वृक्षामुळी । जैसी काळसर्पाची वेटोळी । कामक्रोधाची खोळी । वरूनी वेटोळी ज्ञानगर्भा ।। जरी तुम्हा पाहिजे चंदन । तरी सर्पांचे करा कंदन । कामक्रोधाचे सारुनी आवरण । साधावे निधान ज्ञानाचे ।।

षड्रिपु जोपर्यंत माणसामध्ये आहेत, तोपर्यंत निखळ साधना होणे कठीण आहे. आणि प्रपंच करता करता संपूर्ण षड्रिपुवर ताबा मिळवणे हे तर शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. पण भाऊंनी हीच साधना आपल्या शिष्याना प्रपंच करता करता कशी करावी हे शिकवले. त्यांच्याकडून ती नकळतपणे लीलया करून घेतली. आणि त्यातील कठीण भाग कृष्णभक्तीने बदलुन सहज सोपी करून दिली. भाऊ सांगायचे, साधना करावी लागली नाही पाहिजे. तर ती सहज झाली पाहिजे. नेहमीच्या आयुष्यात ती मुरली पाहिजे. नाथपंथीय साधना जी त्यांच्या गुरूंनी शिकवली होती. ती जशीच्या तशी पचवणे सद्यस्थितीत शक्य नव्हते. म्हणूनच भाऊ महाराजांनी त्यामध्ये बदल करून, त्याला दत्तभक्ती आणि त्यातही कृष्णभक्तीची जोड देऊन सहज केली.भगवान श्री कृष्णाने जन्माला घातलेली सहजयोग साधना पुनर्जिवित केली. कोणत्याही मूर्तिला घडवण्यापूर्वी तिचा पाया घडवणे गरजेचे असते. जर पाया मजबूत तरच इमारत उभी राहील. त्यासाठीच काही पायऱ्या घडवण्यास भाऊंनी सुरवात केली. त्यातली पहिली पायरी नियंत्रण, जे बऱ्याच अंशी पारायणामूळे शक्य होते. विविध संतांच्या ग्रंथाचे पारायण, नियमनपूर्वक भाऊंनी आपल्या शिष्यांकडून करून घेतले. कारण संत ओळखता आल्याशिवाय देव ओळखता येणार नाही. पारायणामुळे, एकाग्रता वाढते, बैठक सुधारते, उपवासामुळे जिभेवर नियंत्रण येते. इंद्रियावर नियंत्रण जमू लागते आणि संतांचे आशीर्वाद मिळतात.

दुसरी पायरी हरीभजन. भजनाने देवाला आळवता येते. जे आपण बोलतो त्यापलीकडे अशी भावनेची एक भाषा आहे. जी संगीतात आहे. हरीभजनांतून ती व्यक्त होते. श्रीहरीला त्याच्या गुणासकट पकडता आले पाहिजे. तिसरी पायरी नामघोष. आपले मन खूप वाईट विचाराने भारलेलं असतं. चुकीच्या पुर्वसंस्कारामुळे नकारात्मक विचार सतत वाहत असतात. नामघोषामुळे देवाचे नाव आपल्या मुखात सतत राहते. तेच नाम आपण कानाने ऐकतो. त्यामुळे मनात निर्माण होणारे आपले विचार हळूहळू बदलू लागतात. सकारात्मकता वाढते. सत्संगाची ओढ लागते. आपण भगवंताशी एकरूप होऊ लागतो. अश्या अनेकविध पायऱ्या आहेत. भाऊ सांगत, कसेही करणे म्हणजे करणे नव्हे. भाऊंनी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक पद्धत घालून दिली आहे. ती त्या पध्दतीनेच करायला पाहिजे. तरच आपल्याला हवे असलेले बदल आपण अनुभवू शकतो. औदुंबर प्रदक्षिणा, ओंकार उच्चारण, गायत्री आणि इतर मंत्रपठण, स्तोत्र पठण हे रोजच्या रोज शिकवलेल्या पद्धतीत करणे आवश्यक आहे. ज्या भाऊ महाराजांनी आपल्या शिष्याना शिकवल्या. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक करून घेतल्या. त्याचे अनुभव दिले. महत्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी विज्ञानाने सुध्दा मान्य केलेल्या आहेत. प्रयोगाअंती हे सर्व सिद्ध झाले आहे.

ज्यामुळे शरीरातील चक्रे हळूहळू जागृत होत जातात. कुंडलिनी जागृतीचा अनुभव येऊ लागतो. व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जंगलात जाऊन साधना करत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात साधनेसाठी लागणारी शांतता मिळणे फार कठीण झाले आहे. त्यासाठी श्रीदत्त क्षेत्री मठ निर्मिती केली. जेणेकरून शिष्य परिवार एकत्र येऊन वरील गोष्टी करू शकेल. रोजच्या जीवनातुन त्याला विरंगुळा प्राप्त होईल. आणि हळूहळू त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहील. सामान्य माणसाच्या मनात असणारा, प्रश्न भाऊ महाराजांनी बखुबिने सोडवला. परमार्थासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही हे सर्वार्थाने दाखवून दिले.
Sahaj-Yog-Sadhana-Payabharni