
श्रीगुरूचरित्रात दुसरा भाग येतो तो म्हणजे कर्ममार्ग! ज्ञान पूर्णत्वास गेले म्हणजे कर्मात चूक होणार नाही. अद्याय २५ ते अध्याय ३७ या विभागात योग्य आचरण कसे असावे? आचरणात कोणत्या चूका होऊ नये? इ. गोष्टींचा परामर्श केला आहे. कर्म कोणालाही चुकले नाही. अगदी देवालाही कर्मापासून वेगळे होता आले नाही. अलिकडच्या काळात `कर्माचा सिद्धांत’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या पुस्तकात या विषयावर अतिसुंदर उहापोह केलेला आहे. पूर्वीच्या काळात आचारधर्माची बैठक बसविताना तत्कालीन ऋषींनी कर्मसिद्धांत वेगळया पद्धतीने मांडला. आज आपण सर्व शिक्षित आहोत, पण पूर्वी तसं नव्हतं. एका वर्गाची भाषा संस्कृत तर इतर वर्गीयांची लोक भाषा होती. एखाद्या गोष्टीची कारणमिमांसा प्रत्येकाला समजावणे शक्य नव्हते. सोशल मिडिया तेव्हा नव्हता. कोणतीही गोष्ट प्रत्येक वर्गापर्यंत पोहचविणे कठीण होते. त्यातच जन सामान्य चार विभागात विभागले गेले होते. प्रत्येक वर्गाचा दर्जा, महत्व ठरलेलं होतं. तत्कालीन भारतात विविध विषयांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ होते. आपण त्यांना ऋषीमुनी म्हणतो. ज्या ऋषीला जे `सत्य’ सापडलं ते त्यांनी मांडलं, पण पुढीला पिढीने ते आपल्या बुध्दीच्या कुवतीप्रमाणे त्याचे अर्थ काढून `शास्त्र असे सांगते’ असा लेबल लावला. परिणामी मूळ सत्य कालबाह्य होऊन नको त्या गोष्टी प्रसारीत झाल्या. दुसरी गोष्ट तत्कालीन बुद्धीश्रेष्ठींनी एखाद्या गोष्टीतील मर्म जगाला कळणार नाही म्हणून त्याला यम-नियमात बांधलं. एखाद्या गोष्टी, नियमाला `यम’ भयाच पुट चढवल की लोक तो नियम सहज भितीपोटी स्वीकारतात. उदा. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिल्यास तो शतजन्म श्वान होईल. यातील मर्म असे की, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये किंवा परस्त्रीबद्दल वाईट विचार करू नये असा आहे. पण हे जर सहज सांगितलं तर ते स्विकारलं जाईलच असे नाही. परंतु भय दाखविल्यास किमान भितीपोटी तरी माणूस त्याचा विचार करेल.

एकंदरीत समाजातील लोकांना विविक्षित आचारधर्मात बांधून ठेवण्यासाठी काही नियम, बंधन निर्माण केली गेली. त्यालाच `धर्म’ असे नाव देण्यात आले. जर असे नसते तर मानवात आणि इतर प्राण्यांत फरक राहिला नसता. सर्व ठिकाणी अंदागोंदी माजली असती. जंगलात आणि गावात फरक राहिला नसता. श्रीगुरूचरित्रात याच कर्मसिध्दांतावर उहापोह करण्यात आला आहे. आचरण शुद्ध कसे असावे यावर भर देण्यात आला आहे. उत्तम परमार्थासाठी किंवा प्रपंचासाठी नैतिकता फार महत्वाची ठरते. स्कंदपुराणातील बऱ्याच कथांचा भाग या विभागात घेतला गेला आहे. या कथा खऱ्या की खोटया हा विषय सध्याचा नाही. फक्त एवढच म्हणता येईल, `भूत’ ही गोष्ट अस्तित्वात नसती तर शब्द तरी कुठून आला असता? काही कथांमध्ये काही भाग मनाला पटणारा नसतो. याच कारण तेव्हा छापखाने नव्हते. ज्यांनी पुढील आवृत्ती लिहिली त्यात आपल्या शब्दांची घुसखोरी केली. असो! दुसरा विषय असा की, ३६ व ३७ व्या अध्यायात कर्माचरणावर लिहिलेला भाग हा फार पूर्वील आहे. कालखंड निश्चित करता येणार नाही. मग त्याकाळातील आचारधर्माचा आता उपयोग काय? निश्चितच काही भाग आताच्या काळात उपयोग नसला तरी सर्व भाग कालबाह्य ठरणार नाही. उदा. `गायत्री’ मंत्रावरील विवेचन, संध्या इत्यादी. त्रिकाल संध्या जरी आज करता येणं शक्य नसले तरी निदान एकवेळ गायत्री जप करणं शक्य आहे. मंत्राचं महत्व सर्वज्ञात आहे. गायत्री मंत्राच्या उच्चारणातून प्रचंड लहरी निर्माण होतात हे आजच्या संशोधकांनी मान्य केलं आहे. आपल्या पूर्वजांनी ते वेगळया भाषेत मांडलं. उच्चारशास्त्राप्रमाणे एखादा सिद्धमंत्र विविक्षित पद्धतीने म्हटल्यास त्याचे परिणाम वेगळे होतात. म्हणणाऱ्याच्या पद्धतीप्रमाणे परिणामात बदल होतो हे सिद्ध झाले आहे. आजही यावर संशोधन चालू आहे. सोमनाथ मंदिरात रूद्र आर्वतन केल्याने एका इंग्रज बाईचा नवरा (आर्मी ऑफिसर) मृत्युच्या दाढेतून परत आला हा इतिहास सर्वज्ञात आहे.

आज आपल्या वाटेला येणारे चांगले-वाईट भोग हे आपल्या मागील जन्माच्या कर्मावर अवलंबून असतात असे आपले पूर्वज सांगतात. किंबहुना `कर्मसिद्धांत’ ही हेच सांगते. वेगळया अर्थाने असही म्हणता येईल की, मागील जन्मातील भोग (चांगले-वाईट) भोगण्यासाठी आपण एका विशिष्ठ कुटुंबात जन्माला येतो. विशिष्ट तारखेला, तिथीला, वेळेला जन्माला येतो. त्याप्रमाणे पत्रिका काढली जाते. ग्रहस्थितीप्रमाणे आपण भोग भोगत नसून आपले भोग ग्रहस्थिती दर्शवित असते. हे शास्त्र इतके प्रगल्भ आहे की, आपली हरवलेली किल्ली सुद्धा कुठे सापडेल हे पत्रिका मांडून सांगता येते. परंतु भक्ताने या विषयात न जाणे योग्य ठरते. पत्रिकेमुळे बरीच माणसे आपली बुद्धी गहाण ठेवून बसतात. या प्रश्नाला `श्रीगुरूचरित्र’ हे उत्तर आहे. या ग्रंथात प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेले आहे. `दत्तभक्ति’ हे त्याचे मर्म आहे. सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवून योग्य मार्गाने दत्तभक्ती केल्यास कोणतेही संकट, अडचण, दु:ख देव दूर करतो. `। दैवापेक्षा देव श्रेष्ठ, प्रयत्नांती परमेश्वर।।’ हे भाऊंनी दिलेले वचन सार्थ ठरते. तुमचं प्रारब्ध कसेही असेल, परंतु त्यापेक्षा देव श्रेष्ठ आहे. फक्त तो देव मिळविण्यासाठी अथवा त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला भक्तीच्या प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागते. विविध प्रकारचे यत्न म्हणजेच प्रयत्न! हे जे विविध प्रकारच्या भक्तीचे प्रयत्न कसे करावे याच मार्गदर्शन श्रीगुरूचरित्र करते. वेगवेगळया जन्मात केलेल्या कर्माप्रमाणे आपल्याला कसा जन्म प्राप्त होतो, तसेच योग्य कर्माचरण केल्याने किती उत्कृष्ट जन्म प्राप्त होतो याचे दाखले श्रीगुरूचरित्रात या विभागात दिलेले आहेत. एका अध्यायात ऋषभयोग्याची सेवा केल्याबद्दल एका गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मी राजकुळात जन्म घेण्याचे भाग्य लाभते. सकाम सेवा आपल्याला उच्च कुळात जन्म देते व निष्काम सेवा भक्ताला मोक्षाला नेते असं गुरूचरित्र सांगते.

अध्यात्मात निष्काम सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रक्टील जीवनात असे शब्द पचनी पडायला थोडे जड आहे. कारण एकाच कंपनीत आयुष्यभर काम करण्यापेक्षा २/३ वर्षे काम करून दुसऱ्या कंपनीत मोठया पगाराची नोकरी मिळविणे सध्या शहाणपण समजले जाते. गोड बोलून हवे तसे काम करून घेण्याला `स्मार्ट वर्कर’ म्हटलं जातं. नैतिकतेची पायरी आपण सोडत चाललो आहोत. निष्काम सेवा तर फारच दूरचा विषय आहे. `कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेशु कदाचन।’ या ओळीवर विनोद केले जातात. कारण त्याचा काढलेला चुकीचा अर्थ. कर्मण्ये…. याचा खरा अर्थ असा की, `तू तुझ्या कर्माला कर्तव्य समज!’ आईवडील तसेच मित्रमंडळी यांच्या प्रेमापोटी केलेली कामे आपण कर्तव्य समजतो. त्याबद्दल मोबदला मागत नाही. हीच विचारधारा आपल्या प्रत्येक कामाबद्दल असायला हवी. ही मनोधारणा निर्माण होणे हे निष्काम सेवेचे खरे इस्पित आहे. भाऊ महाराजांनी शिष्यांना ज्ञानाची जोड देऊन कर्मातून घडविले. मठांची उभारणी करताना त्यातील बरीच कामे बालगोपाळ शिष्यांकडून करवून घेतली. त्यांच्या मनात हरिनामाबरोबर निष्काम सेवेची गोडी लावली. मठामधील सर्व कामे शिष्यवर्ग आपला वेळातवेळ काढून करत असतात.

तरूण वयात नाक्यावर उभे राहून चकाट्या पिटण्यापेक्षा आपला अमूल्य वेळ ईश्वरसेवेत घालवावा हे भाऊनी शिकवलं. सेवा करता करता अनेक विषयाचं ज्ञान होऊ लागलं. जगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आजुबाजूच्या सर्व गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो. भाऊंनी प्रत्येक शिष्याला काही ना काही काम दिले. निष्काम सेवेत गुंग ठेवले. विविध विषयांवरील पुस्तके आणून लायब्ररी उभी केली. कार्य करताना तत्संबंधी माहिती कमी पडू नये याची काळजी घेतली. `तरूणांनी रिकामे राहू नये, सतत काही ना काही तरी कामांत रहावे’ असे भाऊ नेहमी म्हणत असत.

देवकार्यात सेवा करवून घेण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रारब्धाप्रमाणे आपण प्रत्येकजण काही ना काही भोग भोगत असतो. मागील जन्माचे भोग आपण आता भोगत असतो. ते काही केल्या चुकणार नाहीत पण त्याची तीव्रता कमी करता येते. देवाच्या सान्निध्यात राहून निष्काम सेवा केल्यास भोगाची तीव्रता कमी होऊन आजच्या कर्मामध्ये चूका होत नाहीत. उलटपक्षी पुण्याचा साठा वाढू लागतो. देवस्थानी, संगमी, काही उच्चतत्म पवित्र स्पंदने, लहरी काम करीत असतात. या कंपनांच्या कक्षेत गेल्यावर आपल्या शरीरातील पेशींवर, नाडयांवर, चक्रांवर याचा सुपरिणाम होऊ लागतो. आपली पेशी न पेशी बदलू लागते. संचिताची साफ-सफाई होत असते. साधक मोक्षाच्या मार्गाला लागतो. ज्ञानमार्गापेक्षा कर्ममार्ग सोपा असला तरी महत्वाचा आहे. एखाद्या शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीला आपण ज्ञान देऊ शकत नाही, पण त्याच्याकडून चांगली सेवा, चांगले कामे करून घेऊ शकतो. हाच मंत्र भाऊंनी शिकविला आणि प्रत्येकाकडून चांगली सेवा करवून घेतली. निष्काम सेवा मनात ठसवली. `नेकी कर दर्या में डाल।’ अशी हिंदीत म्हण आहे परंतु `सुकर्म कर व ते ईश्वरार्पण कर’ हे भाऊंनी शिकवलं.

पुण्य केल्यास चांगले भोग मिळतात व पाप केल्यास वाईट भोग भोगावे लागतात. वाईट भोग भोगण्यास जन्माला यावे लागते. तसेच चांगले भोग भोगण्यासही जन्माला यावे लागते. एकंदरीत जन्ममरणाची श्रृंखला काही तुटत नाही. () अधिकही असू नये, (-) कमीही असू नये तर (0) च्या स्थितीत स्थीर होता आले पाहिजे. दिवसभरात केलेले पुण्यकर्म / पापकर्म रात्री झोपताना सद्गुरूंना अर्पण करून मोकळे व्हावे. या कृतीने आपण मोक्षाकडे जातो. भगवान कृष्णाने दिलेला हा मंत्र आहे. `तू जे काही कर्म करशील ते सर्व मला अर्पण कर.’ या एका वाक्यात भगवंताने भक्ताला मोक्षाचा सोपा मार्ग दाखविला आहे.
।। सदगुरुअर्पणमस्तू।।