|| श्री गुरुदेव दत्त ||
नवविधा भक्ती…!!!
दत्तभक्ती किंवा आम्ही दत्तभक्त आहोत, हे वाक्य ज्यावेळी ऊच्चारले जाते, त्यावेळी त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अनायसे, एकप्रकारे भीतीयुक्त आदर त्या व्यक्तीला मिळायला लागतो. याचे मूलतः कारण हे आहे की, जनमाणसात हा समज आहे की दत्तभक्ती म्हणजे सोवळं ओवळे, कठीण नियमावली, खडतर वैराग्य. तसेच हे अत्यंत जागृत आणि शीघ्रकोपी दैवत आहे. पण खरे पाहता जे दत्तभक्ती करतात; त्यांना यासारखे प्रेमळ दैवत नाही, असे ठामपणे वाटते. कारण मांजरीचे दात, उंदीरासाठी काळ आहेत. पण तेच तिच्या पिल्लांना कधीच टोचत नाहीत. शेवटास कोणत्याही दैवतेची आराधना केली तरी, आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कारं केशवं प्रतिगच्छति ॥ त्यामुळे होणारा शेवट सर्वांचा गोडच आहे. असो.
स्वतः भाऊ महाराज सांगायचे, मी दत्तभक्त आहे. दत्त अवतारातील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा मी परमभक्त आहे. भाऊ महाराजांनी आपल्या शिष्य परिवाराला हीच कठीण वाटणारी दत्तभक्ती दिली. ती त्यांच्यात रुजवली. दत्त महाराजांच्या ‘स्मरणगामी’ या बिरुदावलीचे अनुभव दिले. आणि दत्तभक्तीची आवड निर्माण केली. दत्तमहाराज आपल्या प्रत्येक भक्ताची आठवण जन्मोजन्म ठेवतात. याचे दाखले गुरुचरित्रात वाचायला मिळतात. अशी ही दत्तभक्तीची शिदोरी आपल्या शिष्यांच्या ह्या आणि पुढे येणाऱ्या कित्येक जन्मासाठी बांधून दिली. भाऊ महाराजांनी आपल्या बाळांना ती कशी शिकवली, त्यात नेमके काय बदल केले, आणि ती कशी सहज करून घेतली, हे पुढे येणाऱ्या मथळ्यावरून लक्षात येईल.

साईचरित्रात सांगितल्याप्रमाणे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत.
श्रवण भक्ती…!!!

नवविधा भक्तीमधला पहिला प्रकार म्हणजे श्रवण भक्ती. भाऊ सांगायचे , माणसाने सतत नामात, आणि कामात दंग असावे. कुठलीही परिस्थिती, काळ, वेळ, असो, सतत त्याचं स्मरण करावं. गुरूकडून मिळालेल्या नामाचं महत्त्व तर अनन्यसाधारण असं आहे. नामस्मरणामुळे पापांच्या राशी जळून दग्ध होतात. अनेक संकटं दूर होतात. ह्यामध्ये आपणच घेतलेलं नाव आपण ऐकायचे असते. भाऊ सांगायचे ज्यावेळी तुम्ही सतत नामस्मरण करत असतात. तेच नाम तुम्ही तुमच्या कानाने ऐकता. तेव्हा मनातील वाईट विचार दूर होऊ लागतात. तुमंच मन त्या नामाशी एकरूप होऊ लागते. एकाग्रता वाढते. आणि नामाची आवड लागते. तुमच्या मनापासून निघणाऱ्या लहरी ह्या चांगल्या विचाराने भारित होतात. तुम्ही सतत तुमच्या आराध्याविषयी नवनवीन माहिती मिळवण्याचा, त्याला जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी प्रयत्नशील होतो. नवविधा भक्तीमधल्या श्रवण या प्रकारात वाचनसुद्धा अंतर्भूत आहे. परमेश्वराला काय आवडत, याचा सतत् विचार होऊ लागतो. आणि नवविधा भक्तींच्या मार्गावर आपलं हे पहिलं पाऊल सहज पडत.
कीर्तन भक्ती / भजन भक्ती…!!!!

नवविधा भक्ती मधली दुसरी पायरी कीर्तन किंवा भजन भक्ती. कीर्तनभक्ती या प्रकारात मुख्यतः हरिकथेचा समावेश होतो. भगवंताच्या सगुणभक्तीवर यामध्ये भर दिला जातो. या कीर्तनालाच भजनभक्ती असंही म्हणतात. कारण, भगवंताच्या गुणांचं पुन्हा पुन्हा गायन केलं जातं. त्याला आळवल जात. अशा या भजनभक्तीने श्रोते आणि गायक या दोघांचीही आध्यात्मिक प्रगती साधते. भजनांने वाचा शुद्ध होते, चारित्र्य आणि शील यांची प्राप्ती होते. आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते. आणि पर्यायाने व्यक्ती भगवद्कृपेला पात्र होते.
स्मरण भक्ती…!!!!

नवविधा भक्तीतला पुढचा प्रकार म्हणजे स्मरणभक्ती. स्मरण म्हणजे भगवंताचं सतत स्मरण करणं, त्याचाच विचार करणं. त्याचं रूप, त्याच्या लीला, त्याची विविध नावं हे अगदी संततधार पडल्यासारखं सतत आठवत राहणं – म्हणजेच स्मरणभक्ती. भजन भक्ती च्या भाषेत सांगायचे तर – हरी बोला देता, हरी बोला घेता। हासता, खेळता हरी बोला।। हरी बोला देता, हरी बोला घेता। भांडता, कांडता हरी बोला।। भगवंताची अशा प्रकारे रोजच्या कामात आठवण ठेवणं म्हणजेच समरणभक्ती!. हे स्मरण हळूहळू आत झिरपत जातं. असं हे परमेश्वराचं नाम अखंड घ्यावं म्हणजेच स्मरण भक्ती होते.
पादसेवन भक्ती…!!!!

नवविधा भक्तीमधली पुढची पायरी म्हणजेच, पादसेवन भक्ती. पादसेवन म्हणजे आपल्या आराध्याची किंवा गुरूंची चरणसेवा. त्यांच्या पायाजवळ बसून अनन्यतेने मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करणं, असा आहे. यामध्ये, त्यांचा उपदेश ऐकणं आणि तो अमलात आणणं, हे मुख्यत्त्वानं आलं. याशिवाय, त्यांच्याकडून भगवद्प्राप्तीसाठी वेगवेगळे मंत्र, वेगवेगळ्या सत्पुरूषांची चरित्रं ऐकणं, याचाही समावेश होतो. ‘तुमच्याशिवाय आता मला कोणी नाही, मी तुम्हाला पूर्णपणे शरण आहे. कृपा करून माझा उद्धार करा.’ अशी त्यांची करूणा प्राप्त व्हावी म्हणून अनन्यतेने प्रार्थना करणं, म्हणजेच पादसेवन भक्ती.
अर्चन भक्ती…!!!


आता नवविधा भक्तीतला अर्चनभक्ती हा प्रकार पाहू. अर्चन म्हणजे पूजा. जे आपलं आराध्य आहे त्याबद्दल आपलं प्रेम, विश्वास आणि आपली श्रद्धा अधिकाधिक वाढावी आणि ती दृढही व्हावी म्हणून अर्चन भक्ती सांगितली आहे. यामध्ये, षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा यांचं फार महत्त्व आहे. अर्चनभक्तीमध्ये आपल्या आराध्याला किंवा भगवंताला सशरीर कल्पून त्याची भक्तिभावाने पूजा केली जाते. जसं, आपण आपल्या प्रिय व्यक्तीला आदर आणि सन्मानाने वागवतो, त्यांना आवडेल त्या गोष्टी करतो तसंच यात असत.
वंदन भक्ती…!!!!

नवविधा भक्तीचा पुढचा प्रकार म्हणजे वंदन भक्ती. वंदन म्हणजे नमस्कार हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण, आपण नमस्कार कुणाला करतो? तर, जिथे आपला विश्वास असतो तिथे. जिथे आपली श्रद्धा असते तिथे. ज्या व्यक्तीच्या हातून आपल्यासाठी काही तरी चांगलं घडलेलं असतं किंवा ती व्यक्ती आपल्या कठीण प्रसंगी आपल्यासाठी धावून आलेली असते. भगवंत किंवा आपले सद्गुरू किंवा आपले आई-वडील हेच आपल्या कठीण समयी धावून येतात. ज्यांना आपण सहज नमस्कार करतो. नमस्कारामुळे अंगी नम्रता येते, आपल्याला आपल्या सद्गुरुंची किंवा भगवंताची कृपा लाभते. आपल्या ठायी असलेले दोष जातात. अशी ही वरवर अत्यंत साधी-सोपी दिसणारी, पण आपल्यातला अहंकार समूळ नष्ट करणारी सहावी पायरी म्हणजे वंदनभक्ती!
दास्य भक्ती…!!!!


नवविधा भक्तीमधली सातवी भक्ती म्हणजेच दास्यभक्ती. दास्य म्हणजे सेवाभाव. आपण जसे आपल्या आईवडिलांच्या, गुरूजनांच्या आज्ञेत राहतो, त्यांना काय हवं-नको ते पाहतो, त्यांची सेवा करतो. अशीच भगवंताची सेवा करणे, म्हणजेच दास्यभक्ती. यामध्ये देवळांचा जीर्णोद्धार, देवळाची व्यवस्था लावने, देवाची पालखी, देवळासाठी लागणारी इतर साधनं, जसं, भांडी-कुंडी, पडदे, आसनं, पूजेची व्यवस्था करणे. स्वयंपाकघरं, साठवणीच्या खोल्या, ह्याची सफाई करणे. यांचा समावेश होतो.
सख्य भक्ती…!!!!

नवविधा भक्तीतली सख्य भक्ती म्हणजे काय, ते पाहू या. सख्य म्हणजे मैत्री. सख्यभक्ती म्हणजे भगवंतच आपला सखा आहे, आपला जिवलग आहे अशी भावना निर्माण होणं. आपण आपल्या सगळ्या गोष्टी गुपितं आपल्या जिवलगाजवळ बोलून दाखवतो, कारण आपल्याला विश्वास असतो की आपली सगळी गुपितं आपल्या भावना त्यांच्याजवळ सुरक्षित तर राहतीलच पण वेळप्रसंगी आपल्याला मदत मिळेल, मार्गदर्शन मिळेल. आपल्या जिवलगाने आपली कानउघाडणी जरी केली तरी आपल्याला माहित असतं की, त्या कडक शब्दांपेक्षा त्या मागची आपल्याबद्दलची जी कळकळीची भावना आहे ती जास्त महत्त्वाची असते. द्रौपदीने कृष्णाला सखा मानलं होतं आणि तोच तिच्या रक्षणाला धावूनही आला. भगवंतप्रति अशी सख्यत्त्वाची दृढ भावना म्हणजेच नवविधाभक्तीतली सख्यभक्ती! या भक्तीमध्ये भगवंताबद्दल असलेला आपला विश्वास, प्रेम, कळकळ सगळं वाढतच जातं. भगवंतदेखील खऱ्या भक्ताला कधीच निराश करत नाही, असा हा सख्य भक्तीचा महिमा!
आत्मनिवेदन भक्ती…!!!!

जेव्हा भक्त नवविधा भक्तीच्या या आठही पायऱ्या चढून येतो तेव्हा, भगवंताशी तो जणू तदाकार होतो. भगवंताशी त्याचा संवाद सुरू होतो. भगवंताला आपल्या मनातलं गुह्यतम गुपित सांगणं, त्याच्यापासून काहीही न लपवून ठेवणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती! आत्मनिवेदन ही एखाद्याच्या विश्वासाची पराकाष्ठा असते. त्यात बिनशर्त समर्पणाची भावना असते. भगवंत आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवेल, त्यात विनातक्रार राहण्याची भक्ताची तयारी झालेली असते. लौकिक सुख-दुःखाला, मानापमानाला, लाभ-हानीला इथे काही महत्त्वच उरत नाही. केवळ भगवंत आणि भगवंतच! अशी ही अवस्था असते. अशीच अवस्था गोकुळातल्या गोपींची होती. त्यांच्यासाठी सगळं काही श्रीकृष्णच होता. त्या श्रीकृष्णापासून वेगळ्या नव्हत्याच. ही केवळ शब्दातीत अशी अवस्था आहे.
|| श्री गुरुदेव दत्त ||