वकृत्व भाऊंचे होते अफाट । तोलून मोलून शब्दांची फेक । मांडणी विषयाची अत्यंत सुबक । हृदयी भिडे आरपार ।।

भाऊ ज्ञानाचा अथांग महासागर होते. बरेच जण विविध क्षेत्रातील विषय घेऊन येत. लहान लहान मुलेमुली त्यांच्या बालबुद्धीला पडणारे प्रश्न सुद्धा विचारत. पण भाऊ प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर त्याला समजेल अशा सहज सोप्या भाषेत देत. त्यांची सर्व उत्तरे, प्रवचने विज्ञानाला धरून असत. अंधश्रद्धेचा भाग कुठेही नसे.
विषय असो कितीही गहन । उकल भाऊंचे मुखातून । होताची सर्वा आकलन । झालेच ऐसे समजावे ।
भाऊ रात्री जेवण झाले की आपल्या सर्व बालगोपाळ शिष्याना घेऊन विविध विषय जसे, ध्वनी, पाणी, अग्नी, माती, देवदेवता, अध्यात्म, मंत्र, विज्ञानशास्त्र, शरीरशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, थ्री डायमेनशन, फोर डायमेनशन, आत्मा, सूक्ष्म देह इ. विविध तऱ्हेने समजवायचे. इतके अफाट ज्ञान..!!! एकदा एकाच्या विनंतीवरून भाऊंनी सर्वाना संभाषण कला शिकवण्यास सुरवात केली. संभाषण कसे असावे, वकृत्व कसे असावे, विषय कसा निवडायचा, त्याचे विवेचन कसे करायचे, इ गोष्टी समजावून सांगितल्या.

भाऊ महाराज, सुंदर वकृत्वासाठी शिष्यांच्या सतत मागे लागत असत. त्यासाठी सुरवातीच्या काळात आपल्या शिष्याना वाशिंदला, जवळपासच्या गावात दत्तभक्तीचा प्रसार करण्यासाठी पाठवत असत. जेणेकरून ते त्रयस्थ माणसाशी बोलताना, हळूहळू त्यांच्यातील न्यूनगंड निघून जाईल. आणि त्यांना संभाषण ही कला अवगत होईल. आज ह्याचाच उपयोग, त्यांचे शिष्य त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात करून सतत नवनवीन शिखरे सहज पार करत आहेत.

|| श्री गुरुदेव दत्त ||