
सदगुरु श्री भाऊ महाराजांचा खरा पिंड परमार्थाचा असला तरी त्यांच्यामध्ये हाडाचा समाजसेवक लपला होता. तरूण पणापासुनच समाजसेवेची आवड भाऊंनी जोपासली होती. वयाच्या वीसाव्या वर्षीच भाऊ सिकंदराबादला गेले होते. रेल्वे युनियनच्या चिटणीस पदाची धूरा त्यांच्या खांद्यावर पडली होती. त्याकाळात तेलगू समाज व मराठी समाज यांच्यात फारसे जमत नसे. त्यांच्यात सलोखा निर्माण करावा या हेतूने १९५३ साली सल्फाज बाजार परिसरात ‘गणेशोत्सव’ सुरू केला. दोन्ही समाजाला एकत्र आणलं. मोठमोठया परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या गावी अनेक सामाजिक कार्ये भाऊंनी केली. कालांतराने समाजकार्याच्या आवडीने, लोकसेवेमुळे भाऊ राजकारणाशी जोडले गेले. आपल्या पदाचा वापर करून अनेक दु:खीतांची दु:खे भाऊंनी दूर केली. खर तर याकाळात या विभागातील लोक भाऊंना एक `खरा समाजसेवेक’ म्हणूनच ओळखत असत. आय्.ए.एस्., आय.आर.ए.एस. परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ‘सेक्रेटरी’ पदाची झूल भाऊंच्या खांद्यावर पडली. मोठमोठी पदे पायांशी आली. नोकरीच्या पगाराव्यतिरीक्त एकही पैसा न घेता भाऊंनी हजारो सामाजिक कार्ये केली, सरकारी धोरण आखली, काही अभिनव कल्पना राबवल्या. रेल्वेच्या नोकरीत असताना, तिकीटाच्या रांगेत उभे राहून वेळ जाऊ नये म्हणून काही काळापूर्वी तिकीट बंच विकत दिले जात असत. त्यातील जेवढ भाड असेल तेवढे तिकीट घेऊन बाहेरच्या बॉक्समध्ये पंच करण्याची कल्पना भाऊंचीच. असामान्य बुद्धीमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रात सामाजिक सेवेच्या कार्यासाठी, लोकांच्या सेवेसाठी अनेकविध कल्पनांचा पाठपुरावा करून त्यांना मुर्त स्वरूप दिलं.

राजकारणाचा संन्यास घेऊन भाऊंनी दत्तमहाराजांच्या आदेशाने दत्तकार्यासाठी आपले उर्वरीत संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. दत्तकार्य करीत असतानाही भाऊंनी समाजसेवेचा झरा आटू दिला नाही. गाणगापूरच्या मठाच काम चालू असतानाच मठाच्या मागील रस्त्याने जाणाऱ्या भाविकांसाठी `पाणपोई’ बांधली. माधुकरी (अन्नदान) सुरू केल. माघ पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या हजारो भाविकांसाठी `माघी अन्नदान सप्ताह’ सुरू केला. संगमावर व भस्माच्या डोंगरावर बसणाऱ्या गरीब दीन, दुबळया, आजारी लोकांसाठी ब्लँकेट, चादर, कपडे, साडया वाटप भाऊ नियमित करीत असत. भाऊंनी उभ्या केलेल्या मठातून कोणीही कधीही उपाशी जाऊ नये, याची व्यवस्था त्यानी करून ठेवली आहे.

गाणगापूरला संगमावर जाण्यासाठी एक पायवाट आहे. श्रीगुरू संगमावर याच पायवाटेने जात असत ही गोष्ट सर्व भाविकांना माहित असल्यामुळे अधिकाधिक भाविक याच रस्त्याने संगमावर जातात. येनकेन प्रकारे या पायवाटेवर खूप घाण होत असते. दर बुधवार व शनिवारी ही पायवाट स्वच्छ करण्याचे कार्य शिष्यांकरवी भाऊंनी सुरू केले. दत्तजयंती निमित्त लाखो भाविक गाणगापूरी दत्त दर्शनाला येतात. थंडीचे दिवस असल्यामुळे गाणगापुरात प्रचंड थंडी असते. पायवाटेने भल्या पहाटे संगमावर स्नानाला जाण्यासाठी झुंबड उडालेली असते. अशा थंडीत या भाविकांना गरमा गरम चहा मिळावा यासाठी अखंड चहा वाटप सुरू केले. शेवटचा भाविक जाईपर्यंत चहा देण्याचे काम चालू असते.
दत्तकार्याबरोबरच दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या देशबांधवाची सेवा करता यावी यासाठी वाशिंद या दुर्गम भागाने वेढलेल्या ठिकाणी मठ उभा करण्याचे कार्य भाऊंनी हाती घेतल. मठाच बांधकाम चालू असतानाच दहागांवमधील मुलांसाठी प्रथम `अन्नछत्र’ सुरू केले. नंतर आजूबाजूच्या १०/१२ दुर्गम पाडयातील बालगोपाळांसाठी सकाळचं जेवण `अन्नछत्र’ सुरू केले. हुशार मुलांसाठी शिष्यवृत्त्या चालू केल्या. खेळात आवड निर्माण व्हावी म्हणून विविध खेळाचे आयोजन केले. त्या दुर्गम भागातील लोकांना वैद्यकिय सेवा उपलब्ध होण्यासाठी मोफत मेडीकल शिबीराचे आयोजन केले. तसेच या विभागातील लोकांसाठी एक मिनी हॉस्पीटल असावं असा भाऊंचा मानस होता. शिवाय या लोकांसाठी फिरती आरोग्य सेवा देण्याचाही भाऊंचा मानस होता. पुढील काळात मानवी जीवन खूप बदलून जाणार आहे. घरातील वृद्ध मातापित्यांकडे दुर्लक्ष होणार आहे, म्हणून वृद्धाश्रम बांधण्यासाठी भाऊ खूप आग्रही होते. वाशिंद मठाच्या एका बाजूला या कार्यासाठी त्यांनी थोडी जमीन राखून ठेवली होती.
समाजकार्याचा हा दिवा अखंड तेवत रहावा म्हणून भाऊंनी शिष्यांना त्यांच्या पश्चात करावयाची कार्ये सांगून ठेवली होती. त्या कार्यासाठी ते सतत पाठपुरावा करीत असत. दत्तभक्तीसाठी भक्तांच्या ठायी असणारे निर्व्याज प्रेम उमलण्यासाठी समाजकार्याची ज्योत मनामध्ये पेटली पाहिजे.
द्वीजसूत मरतां वळले ते मन । हो की उदासिन न वळें आता।। सतीपती मरतां काकुळती येतां। वळलें ते मन न वळे आतां।।

असे टेंब्येस्वामी आपल्या कवनामध्ये मांडतात. त्यात देवाबद्दल असलेला कळवळा, हा दुसऱ्याचं दुःख आपल्या मनाला खोचल्यावर निर्माण होतो; हे स्पष्ट होते. स्वत:मध्ये सर्वार्थाने दत्तभक्त घडविण्यासाठी, समाजकार्याची, निष्काम सेवेची उर्मी मनामध्ये उत्सफूर्तपणे जमीनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या कारंजा सारखी असावयास हवी. असा झरा प्रत्येकामध्ये उमळावा व त्याबरोबर आपल्या कडून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहू नये म्हणून भाऊंनी समाजकार्याची धूरा शिष्यांकडे दिली. समाजसेवा ही दत्तभक्तीचच एक रूप आहे असं म्हणावयास हरकत नाही.
भाऊंनी आपल्या पश्चात आपल्या शिष्यांकडून योग्य ते कर्म करवून घेतलं ।। कर्ता करविता तोच। आपण फक्त निमित्तमात्र ।।
भाऊंनी सुरू केलेली पालखी ज्या भागातून प्रवास करते त्यातील काही भाग हा अतिदुर्गम भागात मोडतो. सन २०११ च्या पायी पालखीचं नियोजन करताना, काही भागाचे सर्वेक्षण करताना असं लक्षात आलं की, काही गावातील लोक अती गरीब असून पालखीचं आदरातिथ्य श्रीमंतासारखं करतात. केवढा मनाचा मोठेपणा! त्याचं मोठ मन पाहून स्वत:च्या मनाच्या कमकुवतेची लाज वाटली. खरतर आपल्या मनात सत्कार्याचे विचारही देव प्रेरीत करत असतो. काही शिष्यांना ते लक्षात आल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली. सर्वेक्षण करण्यात आलं. माळशेज घाटातील काचळवाडी या छोटया गावाची निवड करण्यात आली. त्या विभागातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप असा जंगी कार्यक्रम ठरला. सर्व शिष्य कामाला लागले. सदगुरु काका महाराज पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अदृश्य रूपात भाऊ सर्वांकडून कार्य करवून घेत होते. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम पार पडला. दिवस होता ०५ जून २०११. या दिवशी भाऊंच्या एका नव्या पर्वाला सुरूवात झाली. मिळालेल्या यशामुळे शिष्यांनी मग मागे पाहिलेच नाही. प्रत्येक महिन्याला त्या विभागातील दुर्गम पाडयात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येऊ लागले. मोतीबिंदूचे काही रुग्ण सापडल्याने त्यांचे मुंबईला नेऊन ऑपरेशन करण्यात आले. नैमित्तिक आरोग्य सेवा सुरू झाली. भाऊंचे काही शिष्य, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट आहेत. सर्वानी कामाला झोकून दिले.

या दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्या बरोबरच आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी एका शाळेत `संगणक कक्ष’ बनवून देण्यात आला. दिवाळीला आश्रम शाळेतील मुलांना फराळ खावयास मिळावा म्हणून `मिठाई’ वाटपाचे आयोजन करण्यात आले. सर्व मिठाई विशेषत: महिला शिष्य वर्ग स्वत:च बनवत असत. आजही भाऊ महाराजांच्या जयंती निमित्त मिठाईचे वाटप या आश्रमशाळेतील मुलांना केले जाते.

सदगुरु काका महाराज यांच्या आशीर्वादाने श्रीभाऊ मेडिकल अँन्ड एजूकेशनल ट्रस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली. अडीच-तीन वर्षे माळशेज घाटात काम केल्यानंतर संस्थेतर्फे वाडा, मोखाडा, जव्हार येथे आरोग्य शिबीराचे सेवा कार्य सुरू झाले. हा विभाग अति दुर्गम विभागात मोडतो. वाडयामधील उंबरवाडा (वरसाळे) हे गाव दत्तक घेण्यात आले. एका पाडयाचे विकासीकरण करण्याच्या उद्दिष्टाने त्या ठिकाणी सर्व लक्ष केंद्रित करण्यात आले. पाडयामध्ये झाडे लावण्यात आली. पावसाळयात छत्री वाटप करण्यात आले. दरवर्षी उम्बर पाड्यातील व आजूबाजूच्या पाडयातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतील मुलांना कपडे व इतर लोकानाही कपडे वाटप करण्यात आले. दर सहा महिन्याने गावातील प्रत्येकाला टि. टि. चे इंजेक्शन देण्यात येत असे. दिवाळीला मिठाई वाटप करण्यात येत असे. संगणकाचे शिक्षण मिळावे म्हणून गावातच संगणक कक्ष बनविण्यात आला. थंडी पासून बचावासाठी प्रत्येकाला ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
पुढे कालांतराने डहाणूमधील एका आश्रम शाळेतही दर महिन्याला वैद्यकिय शिबीर चालू करण्यात आले. आश्रमशाळेत एकूण ४५० विद्यार्थी शिकत होते. त्यामधील अंदाजे २५० विद्यार्थीना आरोग्याच्या काहीना काही समस्या होत्या. याच कारणाने प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी व औषधोपचार सुरू केला. मोठया विद्यार्थीनीना आरोग्य विषयक ज्ञान मिळावे यासाठी काही वैद्यकिय तज्ञ व्यक्तींची विशेष लेक्चर ठेवण्यात आली. एक वॉटर फिल्टर बसविण्यात आला. सकाळी मुले थंड पाण्याची आंघोळ करतात. त्यामुळे कित्येकांना थंडी, ताप, सर्दी यांच्या समस्या होत्या. डहाणूची हवा तशी थंडच आहे. यावर उपाय म्हणून आंघोळीचे पाणी गरम मिळावे म्हणून २००० लि.चा सोलर वॉटर हिटर बसविण्यात आला. या शाळेपासून जरा दूर असलेल्या एका दुसऱ्या आश्रमशाळेतील मुलांसाठी संगणक कक्ष बनवून देण्यात आला. या शाळेतील मुलांचीही आरोग्य तपासणी वेळोवेळी करण्यात येत असते.

वाडा मोखाडयातील कार्य चालू असतानाच कसारा स्टेशनपासून ४० कि.मी.वर असलेल्या एका दुर्गम भागातील `कास्टी व सावरपाडा’ या गावामध्ये वैद्यकिय सेवा देण्याचे कार्य चालू करण्यात आले. या भागातील जास्तीत जास्त पाडयांमध्ये पोहचता यावं, यासाठी दोन गाडयांमध्ये दोन टीम काम करत असत. पाडया-पाडयांमध्ये जाऊन रूग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात येत असे. वैद्यकिय शिबीराबरोबरच गावातील इतर समस्यांकडेही लक्ष देण्यात येत असे. काही रूग्णांची मुंबईतल्या मोठमोठया इस्पितळात उपचारासाठी संस्था मदत करीत असते. दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या देशबांधवांचे जे दु:ख आपल्याला दिसेल त्यावर उपाय करण्यासाठी संस्था कटीबद्ध आहे.

आषाढी निमित्त पंढरपूरला लाखो भाविक पायी चालत जात असतात. पावसाचे दिवस असतात. एवढ मोठे अंतर पार करताना कित्येक भाविक आजारी पडतात. बऱ्याच संस्था भाविकांची सेवा करीत असतात. आपल्याकडूनही या विठ्ठल भक्तांची सेवा घडावी या उद्देशाने दर वर्षी वेळापूर या ठिकाणी एकदिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते. हजारो भक्तांची सेवा करण्याचा आनंद मिळतो. या सेवेने जीवन कृतकृत्य झाले. आजही हि सेवा अखंड चालू आहे.

सदगुरु भाऊ महाराजांनी माघी अन्नदानाच्या अनुषंगाने हजारो भक्तांसाठी सेवा यज्ञ सुरू केला. छोटया स्वरूपात सुरू झालेले अन्नदान आज फार मोठयात स्वरूपात रूपांतरीत झाले आहे. नित्य हजारो भक्तांना त्याचा लाभ होऊ लागला आहे. वर्षातून एकदा मोठया प्रमाणात भक्तांची सेवा करण्याची संधी शिष्यांसाठी उपलब्ध झाली. भाऊ महाराजांच्या पश्चात काकाश्रींनी भक्तांसाठी अन्नदानाबरोबरच, मेडीकल कँम्पची सुरूवात केली. मोफत नेत्र तपासणी, गरीब भाविकांसाठी नाममात्र दरात चष्मा वाटप, औषधोपचार व काही प्रकारच्या टेस्ट उपलब्ध करण्यात आल्या. भाऊंनी दिलेली समाजकार्याची दिक्षा त्याचा वारसा जपण्याचा कार्य भाऊंच्या शिष्यांनी तंतोतंत पाळलं.

संस्थेची गाणगापूरची वास्तू ही मुख्य मंदिर व संगम यांच्या मध्यवर्ती भागात आहे. पायवाटेने अथवा रस्त्याने भाविक मंडळी संगमावर जमत असतात. संगमावर स्नानासाठी अलोट गर्दी लोटलेली असते. दर पौर्णिमेला गाणगापूरात संगमावर अलोट गर्दी असते. काही गरीब भाविक आदल्या दिवशीच गाणगापूरात येतात. रात्री संगमावर उघडयावर राहतात. सकाळी स्नान करून दर्शन करून मुख्य (निर्गुण मठात) मंदिरात जातात. माघी पौर्णीमेला यात्रा असल्याने ही गर्दी सात दिवस असते. या सर्व गोष्टींच अवलोकन करून काकाश्रींनी दर पौर्णिमेला संगमावर मोफत आरोग्य शिबीर चालू केले. दीनदुबळया गरीब यात्रेकरूना याचा खूप मोठा लाभ होऊ लागला.

भाऊ महाराजांच्या विचाराने सुरू झालेली ही समाजकार्याची गंगा इथेच थांबली नाही तर दुथडी भरून वाहू लागली. खंडाळा घाटाच्या परिसरात दुर्गम भागाची माहीती भाऊ महाराजांच्या शिष्यांना मिळाली. समाज कार्याच्या आवडीने इतरही काही तरूण हुशार मंडळी या कार्यात सहभागी झाली. हम चलते गये। लोक मिलते गये। कारवाँ बनता गया ।।’ असं काहीस झालं. एका नविन क्षेत्रात समाजकार्याची सुरूवात झाली. या कार्यासाठी मुंबईतील आहिल्या विद्यामंदिर शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आले. आज ते विद्यार्थी मोठमोठया कंपनीत कार्यरत आहेत, पण समाजकार्याच्या आवडीने त्यांना एकत्र आणलं. खंडाळयातील नागनाथ गावानंतर लोणावळयातील आतील भागातील जि. प. शाळेतील मुलांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. इतर काही मुलांच्या व समाजसेवकांच्या मदतीने या पूर्ण विभागातील २०/२२ शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्यात आली.
याच शाळेत दर महिन्याला वैद्यकिय शिबीर राबविण्यात आलं. तपासणी दरम्यान काही काही कुपोषित मुलांची नोंद करण्यात आली. या मुलांसाठी प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले. काही शाळांची परिस्थिती फारच वाईट होती. मुलांना शाळेत गेल्यावर आनंद वाटावा म्हणून शाळांमध्ये ‘बोलक्या भिंती’ बनविण्यात आल्या. काही शाळांमध्ये शैक्षणिक फलक लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर रंगवलेल्या भिंती पाहून मुलांच्या चेहऱ्यावरी आनंद पाहण्यासारखा होता. आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून ज्या शाळांमध्ये संगणक नव्हते, त्या शाळांमध्ये संगणकाचे वाटप करण्यात आले.
अंधाराकडून प्रकाशाकडे..

राजमाची गडावर मागच्या बाजूला `वन्हाटी’ नावाचे छोटेसे गाव आहे. पाडा म्हटलं तरी हरकत नाही. खूप उंचावर असल्याने अजूनही तेथे लाईट पोहोचला नाही. हे लक्षात आल्यावर पूर्ण गाव प्रकाशित करण्याचं काम भाऊ महाराजांच्या शिष्यांनी आपल्या खांद्यावर घेतले. सोलार पॅनलवर दिवे पेटवण्यासाठी लागणारी सर्व सामुग्री मुंबईवरून वन्हाटी गावात नेण्यात आली. कुशल स्वयंसेवकांद्वारे संपूर्ण गावात सोलार कनेक्शन करून वायरिंग करण्यात आली. एल.ई.डी. बल्ब लावण्यात आले. आणि संध्याकाळी सहा वाजता दिवे लागले. संपूर्ण गाव दिव्यांनी उजळुन निघाले. गाव ७० वर्षानंतर प्रकाशमय झाले.
नर्मदा किनारी….

श्री जगन्नाथ कुंटे याच्या पुस्तकांमुळे नर्मदाकिनारी जाण्याची प्रचंड आस निर्माण झाली. भाऊंच्या मुखातून त्याबद्दल बरेच काही ऐकलं होतं. एकदा एका शिष्याच्या बंधूंना ‘आपल कार्य त्या भागात होईल’ असा आशिर्वाद मिळाला होता. सगळी चक्र सदगुरुच फिरवत असतात. एका शिष्याच्या मार्फत नर्मदा किनारी सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली. कोणी ओळखीचं नसतांना, त्या विभागाची माहीती नसतांना, परक्या राज्यात जाणे म्हणजे एक दिव्यच होतं. भाऊंनी हे दिव्य सहज पार करवून घेतलं. सदगुरु कृपेनेच काही ओळखी निघाल्या. सर्वेला गेल्यावर तेथील अनोळखी नर्मदा भक्तांनी जे सहकार्य केले त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. जो विभाग निवडला गेला तो नर्मदा किनारी असलेला अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. पण अतिदुर्गम म्हणजे काय ते तेथे पोहचल्यावर कळले. भाऊंच्या कृपेमुळे, लीलेमुळे नर्मदा भक्तांनी तो भाग मोटरसायकल, चालत, होडीने प्रवास करून दाखवला. रात्री सद्गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या आठवणीने डोळयातून घळाघळा अश्रू वाहू लागले. कारण तो भाग आम्ही स्वत: बघणार होतो. कोणाची मदत मिळाली नसती तर, आणि तस झालं असतं तर आम्ही आमच्या घरी पुन्हा येऊ शकलो नसतो. आजही त्या विभागात अनोळखी माणसाला भिल्ल लुटतात. सदगुरु किती काळजी घेतात याचा पुन: प्रत्यय आला.

या कार्यासाठी तेथील नर्मदा भक्त देवासारखे पाठीशी उभे राहिले. वनवासी बेल्ट येथील दुर्गम पाडयांमध्ये मेडिकल कँम्प करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. नर्मदा समग्र या संस्थेच्या रिव्हर अँम्बुलेन्सचे सहकार्य लाभले. नर्मदा सेवा संघ कार्यकर्त्याची मदत लाभली आणि सेवा कार्य सुरू झाले. नर्मदा किनारी असलेल्या, घोंगसा, भादल, कोडबानी, ककराना या ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले. या गावात बोटीशिवाय पोहचता येत नाही. गावातील मेघा पाटकर प्रणित आश्रमशाळेतील मुलांना व त्याच बरोबर गावकऱ्यांना सेवा मिळू लागली. नर्मदा माईच्या प्रेमाने ऊर भरून आला. सदगुरु कृपेशिवाय नर्मदेच्या किनारी सेवा घडण्याचा योग येत नाही. इतकी वर्षे दत्तभक्तांची, विठ्ठलभक्तांची जी काही सेवा झाली होती त्याचं चीज झालं. भाऊंनी आपल्या लेकरांना सेवाकार्यासाठी अटकेपार नेऊन ठेवले.
सदगुरु भाऊ महाराजांच्या कृपेने ही समाजसेवा उत्तरोत्तर हजार पटीने होतच राहणार यात तिळमात्र शंका नाही.