पायी पालखी परिक्रमा

पालखीत स्वारी नेम गुरुवारी। आनंदे दरबारी वर्णवेणा।

श्रीक्षेत्र गाणगापूर व श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मंदिरात रोज पालखी सोहळा असतो. खरच अनुपम्य असा स्वर्गीय अनुभूती देणारा, जगत्पालकाच्या सार्वभौमत्वाची साक्ष देणारा सोहळा असतो. ब्राह्मणवर्गा व्यतिरिक्त इतर कोणालाही पालखीला स्पर्श करण्यास मज्जाव असतो. पालखी सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला त्या भोईंचा हेवा वाटत असतो. मनातल्या मनात स्वतः च्या जन्माला कोस देत असतो. एकच प्रश्न मनात वावटळ उठवीत असतो की, आम्हाला त्या जगत्पालकाला खांद्यावर घेण्याचे भाग्य का लाभलं नाही?. अर्थातच प्रश्न अनुत्तरीत असतो. आणि देवालाही हा प्रश्न कळला असावा. भक्ताच्या आनंदासाठी तो जगजेठी नेहमी सारखा धावुन आला. भाऊ महाराजांची अनेक वर्षांची ईच्छा पूर्ण झाली. आपल्या शिष्यांच्या खांद्यावर त्या जगत्पालकाची, ‘जो या विश्वाची पालखी वाहतो’, त्या परमेश्वराची पालखी घेण्याची, आनंदनिर्भर होऊन त्यासंगे एकरूप होण्याची ईच्छा पूर्ण झाली.

जो वाहतो विश्वाची पालखी, त्याची पालखी आम्ही वाहतो – सदगुरु श्री भाऊ महाराज

भाऊंच्या वरील वाक्याने पालखीची असामान्य शक्ती निदर्शनास येते. भाऊ महाराजाना  गाणगापूरात असताना सकाळी स्वप्न पडले, स्वप्नात दत्त महाराज स्वतः सांगत आहेत, ‘मला फिरायला वाशिंदला घेऊन चल’. भाऊं खडबडून जागे झाले. त्या स्वप्नाचा अर्थ लावू लागले. थोड्या वेळाने त्यांच्या ही गोष्ट ध्यानात आली, फिरायला घेऊन जायचे म्हणजे पालखी सोहळा. पायी पालखी परिक्रमा. भाऊंनी मनाशी पक्क केलं आणि ही गोष्ट आपल्या शिष्य मंडळीच्या कानावर घातली. सर्व शिष्य परिवाराने ही गोष्ट उचलून धरली. आणि गाणगापूर ते वाशिंद पायी पालखी परिक्रमेचा बेत रचला गेला. गाणगापूर ते वाशिंद, अंतर आहे जवळपास ५५० किलोमीटर. एवढे अंतर पायी कापणे हीच एक सत्त्वपरीक्षा होती. पण भाऊंचे शिष्य मागे हटणार नव्हते. प्रत्येकाणे स्वतःचा खारीचा वाटा उचलला. पालखी समिती ठरवली गेली. काही जुन्या अनुभवी माणसांना पालखीची जबाबदारी देण्यात आली. त्याने नियोजन केले. पालखीचे  विवीध टप्पे ठरवले गेले. दिवसाकाठी दोन टप्पे घेण्याचे ठरले. दुपारी विश्रांतीसाठी आणि रात्री झोपण्यासाठी. त्या त्या टप्प्यावर जाऊन तेथील स्थानिक लोकांची भेट घेण्यात आली. त्यांना पालखीचे महत्त्व सांगण्यात आले. शिवाय सर्वांची जेवणाची नाष्टाची व्यवस्था करण्याची महत्वाची जबाबदारी होती. पण दत्त महाराजांच्या कृपेने ह्यातील बरीचशी व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबणार होती, तेथील गावकऱ्यांनी उचलली. उरलेल्या टप्प्यासाठी समितीने जेवण बनवण्याचे ठरविले.

पालखीचे वेळापत्रक ठरवले गेले. टप्पा प्रमुख निवडले गेले. कारण यासाठी बरेच मनुष्यबळ लागणार होते. भाऊंचे शिष्य तयार होते. वेळापत्रकानुसार तारीख ठरली ०५ मार्च २००२ ते २४ मार्च २००२.  पालखीचे दिवस होते २१ म्हणजे गाणगापूरहुन निघून वाशिंदला पोहचेपर्यंत २१ दिवस पालखीचे भोई पालखी सोबत चालत राहणार होते. माघी अन्नदानाचे दिवस जात होते. मनाची हुरहूर वाढत होती. माघी अन्नदान सोहळा ०३ मार्च २००२ यादिवशी संपला. ०५ मार्च २००२ सकाळी ७.०० वाजता चांदीच्या पादुका निर्गुंण मठामध्ये नेण्यात आल्या. या पादुका निर्गुण मठातील  मुळ पादुकावर ठेवण्यात आल्या. वेदाचे पठण करण्यात आले. रुद्राभिषेक करण्यात आला. मूळ पादुकातील तत्व ह्या चांदीच्या पादुकांमध्ये संक्रमित झाले. त्या पादुका मग भाऊ महाराजांनी स्वहस्तानी पालखीत ठेवल्या. सोबत एक पंचधातूंची दत्त महाराजांची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली.

पालखी परिक्रमेचा पहिल्या दिवसाचा प्रवास भाऊंनी दिलेल्या नियमानुसार, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या अखंड नामघोषात सुरु झाला. सर्व पालखीच्या भोयानी सफेद सदरा लेंगा, खांद्यावर भगवी शाल आणि डोक्यावर सफेद गांधी टोपी परिधान केली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व पालखीचे भोई अनवाणी चालत होते. ते तसेच २१ दिवस चालणार होते. पालखीचे असंख्य अनुभव पालखीच्या भोयांना येत होते. जी इच्छा मनात येई, ती पुढच्या क्षणाला महाराज पूर्ण करत होते.  अन्नपूर्णा सोबत आहे याचा प्रत्येक क्षणाक्षणाला अनुभव येत होता. कल्पवृक्षच्या छायेत असणं म्हणजे नेमकं काय ते आयुष्यात प्रथमच उमजत होत. कस्तुरीगंध सतत आजूबाजूला दरवळत होता. पालखी कधी कधी एवढी जड होई, की चार पाऊले चालणे खूप कठीण वाटे. पण दुसऱ्याच क्षणाला फुलासारखी हलकी होई. अनुभव मालिका प्रत्येकाच्या मनात तयार होत होती. सांगायचेच झाले तर, जर एखाद्या भोईच्या मनात एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली, तर तो पदार्थ पालखीच्या येणाऱ्या टप्प्यावर न मागता ताटात वाढला जात होता. ह्या उपरांत खूप अशी मोठी इच्छा भाऊंच्या शिष्यानी केली नाही. कारण भाऊंची सक्त ताकीद होती. काहीही मागायचे नाही. फक्त तुमच्या भक्तीच्या कक्षेत घ्या, एवढेच सांगायचे.

दरोरोज पहाटे ४ वाजता रुद्राभिषेकाने दिवसाची सुरुवात होत असे. नंतर आरती होत असे. आदौ ब्रम्ह या स्तोत्राचे पठण करून पालखी उचलली जाई. तसेच ज्या ठिकाणी पालखी थांबत असे तिथेही रुद्र होत असे. भजन होत असे. धुपारती कर्पूरा आरती होत होती. कडक सोवळे पाळले जात होते. आणि हे सर्व भाऊंचे शिष्य आनंदाने करत होते. मजल दरमजल करत अखंड नामघोषत पालखी चालली होती. कधीही न येणारे अनुभव गाठीला जमा होत होते. पायाला फोड येत होते. ते फुटत होते. कमालीच्या वेदना होत होत्या. पण कधीही कोणत्याही भाऊंच्या शिष्यांनी ह्याची तक्रार केली नाही. तात्पुरते डॉक्टर उपचार करून पुढच्या प्रवासासाठी सगळे सज्ज होत होते. ज्या ठिकाणी पालखी थांबत असे, तेथिल वातावरणात कमालीची प्रसन्नता जाणवु लागे. पालखी सोबत चालताना थकवा कधीच जाणवला नाही. पण टप्प्यावर पोहचल्यावर मात्र नवल वाटे. कधीही न चालणारे आपण एवढे सहज कसे चाललो. एक अनामिक शक्ती सतत आमच्या बरोबर असल्याचा भास होई. एखाद्या ठिकाणी थांबल्यावर अस वाटे, आता पुढे चालता येणार नाही. परंतु निघायच्या वेळी अवधूत चिंतनचा नामघोष झाल्यावर अंगात दहा हत्तीचे बळ येत असे. कधी कधी एखाद्या टप्प्यावर पोहचल्यावर वरूण राजाचे आगमन होई. त्यालाही देवाची आणि त्याच्या भक्तांची सेवा करण्याची ईच्छा होई. असे वाटे की तो महाराजांच्या दर्शनासाठी येतो आहे. पावसाच्या सरीमुळे मातीचा सुगंध पसरे. वातावरणतील उष्मा निघून जाई, आणि पालखीचे भोई विसाव्यासाठी पडत असत.

असाच एक अनुभव, सर्वानाच नि:शब्द करून गेला. म्हाळुंगे पडवळ या गावातून  पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पालखी निघून गेल्यावर त्या ठिकाणी एक वाघ आला. वाघाला पाहताच सर्व गावकरी आपापल्या घरात जाऊन लपून बसले. ज्या ठिकाणी पालखी ठेवली होती, त्या ठिकाणी त्या वाघाने लोळण घेतली. जवळपास अर्धा तास तो वाघ त्या महाराजांच्या पायधुळीत मनसोक्त लोळत होता. गावकरी आपल्या घराच्या खिडक्या मधून बघत होते. त्यांना काहीच समजत नव्हते. काहीवेळाने वाघ निघून गेला. गावकरी बाहेर पडले. त्यांना नेमका अर्थबोध झाला. त्यानी त्वरित ही बातमी पालखीच्या भोईपर्यंत पोचवली. संपूर्ण शिष्य परिवार त्या पालखीला नतमस्तक झाले. आणि भाऊंच्या आठवणीने डोळ्यात पाणी तरळले.

पुढचा प्रवास आता अधिक जोशात आणि भक्तीमय वातावरणत सुरू झाला. भाऊ भेटीची ओढ खूप वाढली होती. कर्नाटक, सोलापूर, पुणे, जुन्नर, माळशेज, शहापूर  असे रस्त्यात येणारे जिल्हे, छोटी मोठी गावे, ह्यांना भेट देत देत वाशिंद जवळ आले. शेवटचा २१ वा दिवस उजाडला. भाऊंनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरला होता. २४ मार्च २००२, सकाळी १० वाजता पालखी श्रीक्षेत्र वाशिंद दहागाव येथे पोहचली. अवर्णनीय सजावट करण्यात आली होती. रस्त्यात रांगोळ्या घातल्या होत्या. सुवासिनी कलश घेऊन स्वागतसाठी सज्ज होत्या. स्वतः भाऊ आपल्या ह्या शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी हातामध्ये हार घेऊन उभे होते. भाऊ महाराजांनी पालखीला, दत्तमहाराजाना हार घातला , सर्व भोयांच्याही गळ्यात हार घातला. भोयांच्या डोळयांत पाणी आले. आणि त्यांनी भाऊंच्या चरणावर स्वतःला घालून घेतले. भाऊंनी भरभरून आशीर्वाद दिले. आणि पालखी दहागाव दत्त मंदिरात आली. महाराजांच्या पादुका दत्तमंदिरात विधिपूर्वक स्थानापन्न करण्यात आल्या. ह्याच पादुका दर गुरुवारी मठात पालखी सोहळ्यात फिरवल्या जातात. दत्तभक्तांना पालखीखाली झोपवले जाते. त्यांच्या शरीरावरून पालखी नेली जाते. ह्यामुळे येणारी संकटे, आजार दूर होतात. ह्याचे बरेच अनुभव आजतागायत आले आहेत.

वाशिंद ग्रामी आल्यावर, हा भूतो न भविष्यती असा अनुभव. कोणीही भोई त्यातून बरेच दिवस बाहेर पडत नव्हता. म्हणून ‘दत्तपादुका पालखी परिक्रमा विशेषांक’, काढण्यात आला. आलेल्या अनुभवाचे सार अवतरणीकेच्या स्वरूपात मांडण्यात आले. ते वाचले की आजही अंगावर शहारे उभे राहतात. या पादुका दर पाच वर्षांनी वर उल्लेखल्याप्रमाणे भाऊंचे शिष्य पायी परिक्रमा करून गाणगापूर ते वाशिंद चालत आणतात. बाकीच्या वर्षी टेम्पोतून ह्या मूळ पादुकाना स्पर्श करण्यासाठी नेल्या जातात.

साता जन्माची लाभली पुण्याई, म्हणुनी जाहलो पालखीचे भोई।

ह्या वाक्यतील खरा अर्थ त्यादिवशी उमगला. भाऊ महाराजांनी आपल्या शिष्याच्या भल्यासाठी केवढा मोठा घाट घातला. काही क्षणात, साक्षात दत्त महाराजांच्या जवळ नेले. ज्यासाठी कित्येक साधक, दत्तभक्त, तपस्वी जनमोजन्म वाट बघत राहतात. खऱ्या अर्थाने सद्गुरू आपल्या शिष्याच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठीच झटत असतात. फक्त तुम्हाला त्या प्रवाहात राहणे गरजेचे असते. या कवणातून त्यातली गोम लक्षात येते,

परिसच्या संगे लोह बिघडले। लोह बि, घडले सुवर्णची झाले।। सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडले। शिष्य बि, घडले सद्गुरुरुप झाले। आम्ही बिघडलो। तूम्ही बी, घडाल।

भाऊंनी आम्हाला दत्त महाराजांच्या पालखीचे भोई बनवुन सर्वर्वार्थाने घडवले. आपल्या शिष्याचे कितीतरी पुढे येणारे जन्म सहज सोपे करून ठेवले. असे सद्गुरू लाभणे हेच आमचे परमभाग्य. प्रत्येक गुरुवारी श्री क्षेत्र वाशिंद दहागाव याठिकाणी  संध्याकाळी ६.३० मिनीटांनी दत्त पादुका पालखी सोहळा साजरा केला जातो. दत्त महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवल्या जातात. आदो ब्रम्ह या मंत्राने पालखी सोहळ्यास सुरवात होते.

पहिली पालखी विशेषांक वर्ष २००२

पालखी फोटो