गाणगापूर मठ

भाऊंचा पहिला किल्ला

भाऊ महाराज शिष्यांशी बोलताना नेहमी सांगत असत मला दत्त महाराजांनी काही काम दिल आहे.  ते मला पूर्ण करायच आहे. हे  काम होत दत्तभक्ती प्रसाराच. या कार्यानुषंगाने सर्वोत्तपरी प्रयत्न भाऊंनी केले. भाऊ इतिहासतज्ञ होतें. त्या अनुषंगाने सांगायचं झाल्यास दत्त महाराजाच्या मर्म स्थानी आपली सेवा प्रथम रुजू करावी या साठी गाणगापुरात आपला पहिला किल्ला उभारायचा ठरवलं. त्यास कारणही तसंच घडलं….

भाऊ महाराज तरुण पणापासून शिर्डीचे वारकरी होते. नोकरी करीत असताना ही ते काम पूर्ण करून शिर्डीला जात असत. भेट धावत पळत असायची. रेल्वेच्या नोकरीत असतानाही असच चालू होतं. रेल्वेत पी.अण्णा स्वामींची भेट झाली. साधनेच पुढिल शिक्षण चालू झाल. पी. अण्णा स्वामी भाऊंचे ऑफिसर होते. ते भाऊना सुट्टी देत असत. IAS झाल्यावर एकदा भाऊ गुलबर्ग्याला तपासणीसाठी गेले होते. भाऊ ज्या ठिकाणी जात त्या भागातील देवस्थानांना प्रथम भेट देत. गुलबर्ग्याला आल्यावर ते प्रथम गाणगापूरला आले. भाऊंचे आजोबाही दत्तभक्त होते. त्या काळात ते बोटीने गाणगापूरला आले होते. भाऊ पायवाटेने संगमावर जात असताना. आता जिथे आपला मठ आहे तिथे आले. त्या जागेवर एक साधू कित्येक वर्षे तपश्चर्या करीत होता. त्या साधूने भाऊना बोलावले आणि म्हणाले. ‘बेटा तुम यहा आवोगे’. भाऊंनी त्या साधूंना नमस्कार केला. पण त्यांच्याही मनात विचारांचा कल्लोळ माजला. मी इथे कशाला येईन? काही दिवसांनी भाऊ विसरून गेले. शिर्डीची सेवा चालूच होती. भाऊंनी शिर्डीत पुरुषसुक्त चालू केलं. लेंडीबागेत सामुदायिक श्री साईसत्चरित्र पारायण आयोजित करीत असत. पारायण चालू असताना कित्येकानी भाऊना बाबांशी प्रत्यक्ष बोलताना पाहिल होत. संतांच्या लीला अगाध असतात. एके दिवशी बाबांनी भाऊंना सांगितल.. ये दिया मैन वहासे लाया है। अब तुम वहां जाओ। आणि भाऊ गाणगापुरात आले. प्रथम भाऊ एकटेच गाणगपुरला येत असत. संगमावर पारायण करीत असत. माधुकरी मागत असत. भस्माच्या डोंगरावर भिक्षा मागत असत. हळूहळू काही सहकारी भाऊना भेटले. तेही येऊ लागले. दत्तभक्तीचा प्रसार आणि प्रचार ह्याचा ध्यास भाऊंनी घेतला. नवीन नवीन माणसे ह्या प्रवासात जोडली जात होती.

भाऊंना पडलेले सुरेख स्वप्न

एके दिवशी, गाणगापूरमध्ये असताना भाऊंना स्वप्न पडल. एका सुंदर जागेमध्ये भाऊ महाराज उभे आहेत. तिथं स्वतःच अस काही उभं राहत आहे. स्वप्नातून भाऊ जागे झाले. स्नान वैगरे आटपून भाऊ महाराज वामन भटजी (आमचे गाणगापूरचे उपाध्याय) यांच्या घरी गेले. तिकडे वामन भटजींना पण हेच स्वप्न पडले होते. ह्याचवेळेस आमचा एक गुरुबंधू गाणगापूरात राहत होता. त्यालाही असच स्वप्न पडले. वामन गुरुजींनी सांगितले, ती जागा माझ्या परिचयाची आहे. मी तुम्हाला ती दाखवतो. ती जमीन दीपक भटजी यांची होती. दीपक भटजी बरोबर बोलणी झाली. आणि व्यवहार जुळून आला. त्यावेळेस एक अदभुत घटना घडली. जी वामन भटजींनी काही वर्षानंतर सांगितली. ती अशी, जेव्हा भाऊ महाराज, वामन भटजी आणि दीपक भटजी त्या जागेवर उभे होते. त्याचवेळेस श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी येऊन भाऊ महाराजांना मिठी मारली. हे दृश्य त्यांना दिसले, कारण तेही महाराजांचे परम भक्त होते. अनामत रकम ४०००/- देण्याचे ठरले. त्यातही पैश्याची समस्या होतीच. भाऊंनी आपल्या सर्व सहकाऱ्याना गोळा केले. कुणाकडून ५००/- कुणाकडून २००/- असा मदतीचा हातभार लागला. बरोबर ४०००/- रक्कम जमा झाली. अनामत रक्कम दीपक भटजींच्या हवाले करून भाऊ आनंदाने मुंबईला परतले.

मठाच्या बांधकामाला सुरुवात

जागेची उरलेली रक्कम आणि बांधकामासाठी येणारा खर्च खूप मोठा होता. बऱ्याच मदतीची गरज होती. बहुतेकांनी हातभार लावला होता. पण अजून तो पुरेसा नव्हता. भाऊंनी एक नामी योजना राबवायचे ठरविले. योजना होती लॉटरीची. या लॉटरीमध्ये खुप लोकांना बक्षीस लागले व काही रक्कम ही उभी राहिली. ही रक्कम गाणगापुरच्या जमीनीसाठी वापरण्यात आली. काही शिष्यानी वेळप्रसंगी आपले पगारही भाऊंच्या चरणाशी घातले आहेत. सर्वांच्या सहकार्याने मठ उभा राहु लागला. काही तरुण शिष्यानी आपल्या तारुण्यातील महत्वाची वर्षे मठाच्या उभारणी साठी दिली. कित्येकानी शिक्षण सोडले. नोकऱ्या सोडल्या. एकच ध्यास सर्वाच्या मनात होता. भाऊंचा मठ उभा राहिला पाहिजे. पैशाची कमतरता होती म्हणून शिष्य एक वेळ जेवण करीत व एक वेळ माधुकरी मागत असत. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. भाऊही ही गोष्ट विसरले नाहीत. मठ पूर्ण झाल्यावर त्या सर्वांची नावे  मठाच्या दर्शनी भागात सुवर्ण अक्षरात लिहिली गेली..

एकहाती बांधकामचे काम एका कंत्राटदारला देऊन पूर्ण करून घेणे शक्य नव्हते. कारण मुळात तेवढा फंड एकदम जमा होणे शक्य नव्हते. भाऊंनी टप्याटप्याने काम करण्याचे ठरविले. भाऊंनी रामाचे रूप घेऊन आपली वानरसेना ह्या कामासाठी वापरली. भाऊंचे लहान लहान शिष्य मठाच्या बांधकामसाठी गाणगापूरला जाऊन राहू लागले. तिथल्या कामावर जातीने लक्ष ठेऊ लागले. अनेक मुलांनी तेथे राहून दत्त सेवेत खारीचा वाटा उचलला. मठ अस्तित्वात नसल्याने मंदिराकडे जाणाऱ्य रस्त्याच्या जवळ असणाऱ्या “आश्रित “या धर्मशाळेत सर्व रहात असत.आश्रितची  व्यवस्था एक मुस्लिम बाई पहात असे. मूल तिला अम्मी म्हणायचे. खरच ती सर्वांची अम्मीच होती. तिची मुलंही या मुलांबरोबरची होती. तिच्या हातच्या भाकऱ्या आईच प्रेम देत होत्या. नकळत सर्वधर्मसमभाव भाऊंनी शिष्याना शिकवला. कामाचं स्वरूप मोठं होत व खेड असल्याने उत्तम कारागीर गणगापुरात नव्हते. बरेच महिने राहावं लागतं असे. काही कामाचा भाग पूर्ण करून मुलं मुंबईला येत असत. पैसे जमा झाले की कोणीतरी पुन्हा येत असे. हळूहळू पडलेलं स्वप्न आकार घेऊ लागलं होतं. भाऊंच्या गाणगापूरच्या फेऱ्या वाढू लागल्या.

भाऊ कल्पकतेने एक एक गोष्ट बांधकामामध्ये सांगत होते, आणि छोटे मावळे ती आपल्या विविधरंगी बालबुद्धीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. अनुभव कोणाकडेच नव्हता, पण भाऊंचा शब्द खाली पडू न देणे हे त्यांचं ब्रीदवाक्य झालं होतं. सतत वेगवेगळी कामे करत करत, सुतार काम, लोहारकाम, गवंडी काम हयात सर्वाना प्राविण्य मिळू लागल होत. सगळे काही तेच होते. नवनवीन शकला लढवणे, आणि आपलं काम पूर्ण करणे हा त्यांच्यासाठी आता खेळ झाला होता. वास्तुच्या पायाचे (फौंडेशन) खड्डे पाडणे, भिंती उभारणे, वाळू उपसने, फरशी बसवणे,  पाणी भरणे ह्या आणि अश्या असंख्य सेवा हे सर्व मिळून आपल्या आई वडिलांपासून दूर राहून तन्मयतेने करत होते. ह्यातील पाणी भरणे हि सेवा तर खूप कष्टप्रद होती. कारण गाणगापूर मूळात वाळवंटासारखा उजाड परिसर. तेथे पाण्याचं सतत दुर्भिक्ष. त्यात कडाक्याचे उन लागत. अश्यावेळी मठात पाण्याची व्यवस्था न्हवती. पाण्यासाठी भागीरथी कुंडावर जावे लागे. हे कुंड मठापासून साधारण दिड किलोमीटर अंतरावर आहे. अश्या परिस्थिथीत बऱ्याच वेळा पोटभर जेवणाची वानवा असायची. अश्या वेळी माधुकरी शिवाय पर्याय नसायचा. जे मिळायचं ते आहे तस गोड मानून, खाऊन दिवस ढकलाला जायचा. भाऊना सुद्धा परिस्थीतिची जाणीव होती. फोनची व्यवस्था नव्हती. कासव जसे आपल्या पिल्लाना फक्त आपल्या अमृत दृष्टीने पोसते, तसेच भाऊ आपल्या ह्या निरागस बाळाची जबाबदारी सर्वार्थाने वाहत होते.  मुंबईवरून येताना सर्वांसाठी आवर्जून खाऊ, कपडे, चादरी, टॉवेल घेऊन यायचे. त्यांच्याकडे कधीही कोणत्या मुला-मुलींनी काहीहि मागीतले नाही. तरी सुद्धा त्यांना नेमकं माहीत असायच कोणाला कशाची गरज आहे. न मागता ते ती वस्तू त्याच्या साठी घेऊन यायचे. त्यावेळी त्या मुलाचा – मुलीचा आनंद गगनात मावत नसे. आपल्या ह्या मुलामुलींवर भाऊंचे सर्वाधिक प्रेम होत. सगळ्यांसमोर भाऊ बोलायचे, माझी मुलं वाघ आहेत, म्हणून आज एवढा मोठा मठ तयार झाला. भाऊ आल्यावर बांधकाम बघत असत. काही सांगितल्याप्रमाणे झालेले असे तर काहीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या असत. पण भाऊ त्या चूका दाखवण्यापेक्षा त्याच्यात योग्य तो बदल सुचवून ती चूक सुधारून घेत. त्या शिष्याला आपसूक आपल्या चुकीचा उलगडा होत असे. आणि भाऊंनी ती सहजपणे कशी सुधारली ह्याचा धडा मिळत असे. नकळतपणे त्या शिष्याच्या मनात भाऊंप्रतीचा आदर द्विगुणित होत असे. भाऊ नुसताच मठ उभा करत नव्हते, तर त्याययोगे अनायसे एक शिष्य (मनुष्य) घडवत होते.  भाऊनी मठाच्या बांधकामाबरोबर ह्या लहानग्यांच्या मनावर नकळत निष्काम सेवेचे संस्कार करायला सुरुवात केली होती. हि निष्काम सेवाच होती. कारण ह्यामधून कोणताही मोबदला मिळणार नव्हता. हे चाललं होतं फक्त भाऊंच्या प्रेमापोटी. ह्याची दखल भाऊंनी हि घेतली. मठाच्या दरवाज्यावर सर्वांची नावे कोरून घेतली. ज्यांनी सर्वात जास्त सेवा दिली आहे, त्याचा सोन्याची अंगठी देऊन गौरव करण्यात आला.

भाऊनी दत्त महाराजांच्या कार्यासाठी झोकून दिल होत.

भाऊ गाणगापूरात आले, की तो दिवस खूप आनंदाचा असायचा. भाऊ रात्री जेवण झाले की आपल्या सर्व मुलामुलींना घेऊन आध्यात्मिक गोष्टी सांगायचे. त्यांचे दत्त महाराजांबरोबर होणारे संवाद अनुभव सांगायचे. विषय कोणताही असला तरी ते विज्ञानाला धरून सांगत. कुठेही अंधश्रद्धा नसे. बऱ्याचदा आश्चर्य वाटत असे, भाऊंना एवढे ज्ञान येते कुठून?. कारण, कोणताही विषय असो, ध्वनी, पाणी, अग्नी, माती, देवदेवता, अध्यात्म, मंत्र, विज्ञानशास्त्र, शरीरशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, थ्री डायमेनशन, फोर डायमेनशन, आत्मा, सूक्ष्म देह इ. कोणत्याही विषयावर तासनतास न दमता, न थकता, न थांबता सहज बोलायचे. इतके अफाट ज्ञान ! कधी कधी बोलता बोलता साधनेतील एखादी साधना सहज शिकवायचे. त्यावेळचे हे दिवस त्यांच्या आयुष्यातले कधीही न विसरण्यासारखे दिवस आहेत. भाऊंनी दत्त  महाराजांच्या कार्यासाठी झोकून दिल होत. आपलं शिक्षण, हुद्दा, पत, प्रतिष्ठा सर्व काही विसरून जमिनीवर उतरून बाळगोपाळाना सेवा करता करता घडवीत होते.

मठाचे बांधकाम पूर्ण होत आले होते. मठामध्ये असणारे दत्तमंदिर सुद्धा मुलानीच बांधले. मठाच्या सजावटीला सुरवात झाली. भाऊनी प्रवेशद्वारावर गोवर्धनधारी कृष्णाची मूर्ती आणि तो प्रसंग मूर्तीरूपात घडवून घेतला. त्याच्या खाली कृत्रिम धबधबा बनवण्यात आला. आणि विशेषतः हे सर्व मुलांनीच बनवले होते. काहीही विकत आणले नव्हते. पैसे खर्च न करताही सजावट करुन मठ सुशोभीकरण करण्यात आले. टाकाऊ पासून टिकाऊ आणि त्यातही देखणे, असेही करता येऊ शकते हे सहज सिद्ध झाले होते. रंगकामही भाऊ स्वतः उभे राहवून करून घेत असत. मुलांनी पालखी रोडवरील प्रवेशद्वारावर द्वारकामाई आणि साईबाबांचा देखावा उभारला. त्याच्या बाजूला कैलासपती महादेव आणि त्यांच्या जटेतुन वाहणारी खरीखुरी गंगा हे तर त्यातील प्रमुख आकर्षण होते.

भाऊंचे निसर्ग प्रेम वादातीत होते. मठामध्ये विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे लावण्यासाठी भाऊ सतत पाठपुरावा करत असत. खूप दूर दूरच्या नर्सरी मधून विविध झाडे आणून ती मठामध्ये लावली जात असत. निसर्ग कसा जपायचा, त्याच्याशी कस एकरूप व्हायचे, झाडाशी कस बोलावं, हे प्रत्यक्षरित्या प्रत्येकाला शिकवले. त्याचे अनुभव दिले.

भालचंद्र महाराज उपासना मठ भव्य दिव्य स्वरूपात दिमाखात श्री क्षेत्री उभा राहिला. १९९४ साली  दिवाळीला उद्घाटनाचा अपूर्व कार्यक्रम झाला. वामन भटजींनी मंत्रोच्चाराने मठ भारावून टाकला. सर्व ब्राम्हणांना भाऊंनी यथोचित दान केलं. मठ उभा केला पण ती केवळ वास्तू म्हणून उभी न राहता त्यामध्ये जिवंतपणा आला पाहिजे. देवाचे अनुष्ठान बसले पाहिजे. त्यासाठी भाऊंनी नित्य नामघोष, रुद्र आवर्तन, मंत्रपठण, गुरुचरित्र पारायण, अनुष्टान सेवा, नारायण सेवा, माधुकरी सुरू केले. ही सेवा आजतागायत सुरू आहे. नित्य माधुकरी सेवा चालू राहावी या साठी एक अभिनव कल्पना रुजवली. अक्षय माधुकरी योजना या योजनेद्वारे काही रक्कम घेतली जात असे. अनामत रक्कमेच्या वर्षाच्या व्याजातून एक दिवस त्या व्यक्तीच्या नावाने माधुकरी वाढली जात असे. ३६५ नावे पूर्ण करण्याचा संकल्प करणयात आला. शिष्यानीही कंबर कसली. योजना यशस्वी झाली. देणगीदारांची नावे लादीवर कोरून पायवाटेच्या दर्शनी भागात लावण्यात आली.

जेंव्हा मठात पुरेस पाणी नव्हते, तेंव्हा भाऊनी यात्रेकरुंसाठी पाणपोई बांधली. यातून बरच काही शिकण्यासारखं आहे. मठाच्या मागची पायवाट संगमावर जाते. अष्टतीर्थासाठी भाविक याच वाटेने जातात. या पायवाटेवर खूप वर्दळ असल्याने खुप कचरा व घाण होत असे. ही दत्तमहाराजांची पाऊलवाट आहे हे लक्षात घेऊन आठवड्यातून दोन दिवस  पूर्ण पायवाट स्वच्छ करण्याचे कार्य सुरू केलं. जे आजतागायत चालू आहे. या गोष्टीवरून आजही गाणगापूर मधील जुनी माणसं भाऊंची आठवण काढतात.

भजन पूजन नामघोष दिगंबराचा जल्लोष मंद दरवळे कस्तुरीचा सुहास दत्तगुरु दाविती उपस्थिती ।।

भाऊंनी मठामध्ये, “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” ह्या नामघोषाची सुरवात केली. हा नामघोष दरोराज संध्याकाळी दिवेलागणीच्यावेळी मठात केला जातो. सुरवातीला नामघोषावेळी एक नाग मठाच्या दरवाज्यात येऊन फणा काढून डुलत असे.  असे कितीतरी जणांनी स्वतः भाऊंना सांगितले आहे. दत्त महाराजानी भाऊंना सांगितलं मठाचा मागचा दरवाजा उघडा ठेवा. मी माझ नाव ऐकायला येतो. त्या पासून नामघोषाच्या वेळी मागचा दरवाजा उघडा असतो. बरेच लोक त्या  नागाला पाहून घाबरून पळत असत. कारण नागाच रूप प्रचंड मोठ होत. भाऊंनी पुन्हा महाराजाना प्रार्थना केली ,” देवा तुम्ही अशा  रूपात दर्शन देऊ नका, माझी मूल घाबरतील” त्यापासुन  नाग दिसेनासा झाला. कस्तुरीगंधाच्या सुहासाने, दत्तप्रभूंनी स्वतःची उपस्थिती हजारो वेळा दाखविली आहे.

गाणगापूरची पाऊलवाट

गाणगापुरच्या कणाकणा मध्ये महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष आहे. भाऊ जेंव्हा जेंव्हा गाणगापूर राहत असत तेव्हा नेहमी ,पहाटे चालत, नामस्मरण करत संगमावर जात असत. त्या वयातही ते कधी ही रिक्षा ने गेले नाहीत. हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्या मागे एक कारण दडलेले आहे. ज्या मागच्या रस्त्याने आपण संगमावर जातो ती पूर्वी पायवाट होती. सतीचा कट्टा याच वाटेवर आहे. स्वामींची बहीण रत्नाबाई यांची झोपडीही याच वाटेवर होती. त्याच रस्त्याने श्री गुरु (श्रीमननृसिंहसरस्वती) रोज पहाटे संगमावर जात असत व दुपारच्या वेळेला माधुकरी साठी गावात येत असत. हा त्यांच्या नित्याचा शिरस्ता होता. स्वामी अंदाजे २० वर्ष गाणगापुरात राहिले. म्हणजे २० वर्ष त्या पाऊल वाटेला, मातीला स्वामींच्या पावलाचा स्पर्श होत होता.

त्या पाऊल वाटेची माती कपाळावर भस्मासारखीच चर्चित करावी इतकी श्रेष्ठ आहे. त्या पाऊल वाटेवरून आपण जेव्हा अनवाणी चालत जातो तेव्हा अनाहुतपणे स्वामींच्या भक्तीचा सूर मनात गुंजारव करू लागतो. मन पुलकित होऊन जात आणि स्वामीच्या आठवणीने डोळ्यात आसव घर करू लागतात. स्वामी कसे दिसत असतील? त्याचं रोज दर्शन घेणाऱ्यांना काय वाटत असेल? त्यांना उन्हाचा, पावसाचा त्रास होत नसेल का? त्यांच्या पायाला खडे लागत नसतील का? भक्तांच्या कल्याणासाठी देवा किती कष्ट घेशील रे? सर्वांच्या चोचीसाठी दाण्याची व्यवस्था करणाऱ्या जगनियंत्याने माधुकरी साठी झोळी पसरावी ?
असे अनेक प्रश्न मनात काहूर माजवत त्या सृष्टीकर्त्यापुढे लीन होतात. आज ही त्या वाटेवर स्वामिनी कित्येक भक्ताना दर्शन दिले आहे आणि पुढे ही देतील. अनेक भक्तांना या वाटेवर चंदनाचा किंवा कस्तुरीचा सुगंध अनुभवास आला आहे. जणू काही महाराज स्वतः अस्तित्वाची पदोपदी साक्ष देत असावेत .
|| हम गया नही जिंदा है ||

आतापर्यंत दिवाळीच्या सणासाठी गाणगापुरात आल्यावर धर्मशाळेत उतरावे लागे. ह्यावेळी भाऊंचे शिष्य स्वतःच्या घरात उतरत होते. हा आनंद काही वेगळाच होता. अष्टतीर्थ, पारायण, भाऊबीज, पालखी सेवा, कुलदेवता आवाहन,पंचोपचार पूजा  अश्या प्रतिवर्षीच्या सेवा करताना ह्यावेळेस एक वेगळं चैतन्य जाणवत होतं. भाऊंनी लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, रास गरबा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ह्या विविध स्पर्धांचे आयोजन केले. दिवाळी सण साजरा करून सर्वजण परत मुंबईला परतले.

कार्तिक पौर्णिमेला येणाऱ्या पालखी स्वागतासाठी भाऊंनी ध्यास घेतला. भाऊंची इच्छा होती की, महाराजांची पालखी काही काळ आपल्या मठाच्या दारात थांबावी. आपल्या शिष्यांना त्याचे आदरातिथ्य करता यावे. भाऊंनी ब्राह्मणांकडे ही इच्छा मांडली. ब्राह्मणांनी त्या बदल्यात मोठ्या रक्कमेची मागणी केली. भाऊ खिन्न मनाने मठात परतले. कारण आज मी ही अट मान्य केली तर पुढे माझ्या शिष्यांना हा त्रास वाढत जाणार. त्या दिवशी भाऊ न जेवताच आपल्या खोलीत झोपायला गेले. सकाळीच भाऊ उठले. खूप प्रसन्न होते. सर्वाना तयार राहायला सांगितले आणि मठाच्या दरवाज्यात येऊन उभे राहिले. तिथून ते ब्राम्हण पळत पळत आले. आणि भाऊंना नमस्कार केला. भाऊंना म्हणाले आम्हाला माफ करा. स्वतः दत्त महाराजांनी काल स्वप्नात येऊन सांगितले की, मला तिथे थांबायचे आहे. पालखी तिथे न थांबवणारे तुम्ही कोण? ब्राम्हणांनी  भाऊंना विचारले, पण ही गोष्ट तुम्हास कशी कळली? भाऊंनी सांगितले महाराजांनी जसे तुम्हास सुचवले. तसेच, माझ्या स्वप्नात येऊन सांगितले, मी येतो आहे. स्वागताची तयारी करा. तेव्हापासून दर कार्तिक पौर्णिमेला महाराजांची पालखी मठासमोर थांबते. सर्व शिष्यगण पालखीचे यथोचित स्वागत करतात. उत्सवमूर्तीला महावस्त्र अर्पण केले जाते. भक्तांची योग्यप्रकारे सेवा केली जाते. ही सेवा आजपर्यंत अखंड चालू आहे. कार्तिक पौर्णिमेला, संगमावर जे नृत्य मुल मुली दत्त महाराजांसमोर सादर करतात ते सर्वप्रथम नृत्य भाऊंनी स्वतः गाणं रचून बसवले. गाण्याच्या ओळी होत्या,

कुणी नाही ग कुणी नाही। आम्हाला पाहत बाई। ही पहिली दुसरी मी। कितीतरी जमल्या भोवताली।

पुढे ह्याच मठामध्ये संस्थेची पहिली स्मरणिका काढली गेली. त्यांनतर दिवाळीच्या दिवशी, पहिला दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला. त्याच्या पाठोपाठ गाणगापूर दर्शन दिनदर्शिका प्रसिध्द झाली. ह्या सर्वाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जमा झालेली रक्कम पुढील बांधकामासाठी वापरण्यात आली. आणि मठाची कक्षा रुंदावण्यास मदत झाली. नंतरच्या काळात मूळ मठाच्या वरती आणखी एक मोठ सभागृह बांधण्यात आल. आतल्या बाजूस नवीन एनेक्स बिल्डिंग बांधण्यात आली. त्या इमारतीच्या वरही काही खोल्या काढण्यात आल्या. समोर मोठी गच्ची मोकळी राहील याची दक्षता घेण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी सर्व तरुण वर्ग मोकळ्या गच्चीतच झोपतात. ही सवय भाऊंनीच मुलांना लावली होती. मागच्या बाजूला एक मोकळा जमीनीचा भाग होता तिथे अन्नदानासाठी कंबरे एवढं  बांधकाम करून मोकळं सभागृह करण्यात आलं.

दत्तजयंती

गाणगापूरात मार्गशीर्ष पौर्णिमा रोहिणी नक्षत्रावर दत्तजयंती हा उत्सव साजरा केला जातो. ह्या सोहळ्यासाठी बरेच भक्तगण महाराजांच्या दर्शनासाठी येतात. त्यावेळी गाणगापूरात खूप कडाक्याची थंडी पडलेली असते. सर्व भक्त शक्यतो गरम गरम चहा पिण्यासाठी आसुसलेले असतात. हा अभ्यास करून, दत्तजयंतीचे औचित्य साधून भाऊंनी दत्तभक्तांसाठी चहा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. सर्व दत्तभक्तांना दरवर्षी गरम गरम आल्याचा, सुगंधीत मसाल्याचा चहा दिला जातो. ज्यामुळे सारे भक्तगण तृप्त होतात.

भाऊंचे व्यास पूजन

त्यापुढे आणखी एक चमत्कार महाराजांनी घडवीला. गाणगापूरमध्ये श्रीपादभट नावाचे ब्राह्मण आहेत. त्यांच्या स्वप्नात जाऊन भाऊंना आलिंगन देण्यास सांगितले आणि भाउ कोण आहेत त्याचा खुलासा केला. श्रीपादभटजी सकाळीच मठामध्ये आले, आणि भाऊ माउलींनी दृढ आलिंगन दिले. हा सर्व वृतांत इतर ब्राह्मनाही सांगितला आणि भाऊंची एक वेगळी ओळख पुन्हा करून दिली. याच दरम्यान श्री वामन भटजी ह्यांचा मुलगा श्री योगेश भट यांच्याही स्वप्नात जाऊन गुरुपौर्णिमेला व्यासपूजन करण्यास सांगितले. पडलेले स्वप्न त्यांनी वामन भटजींना सांगितले, आणि गुरुपौर्णिमेला मठामध्ये भाऊंचे व्यासपूजन करण्यात आले.

माघी अन्नदान

माघी पौर्णिमेच्या काळात गाणगापूर येथे मोठी यात्रा भरते. ह्यासाठी बऱ्याच लांबुन दत्तभक्त स्वामी महाराजांच्या केवळ दर्शनासाठी आतुरतेने येत असतात. ही सर्व भाविक मंडळी येताना फक्त आपल्यासोबत एक गाठोडे घेऊन येतात. त्याची ही अवस्था पाहून भाऊंनी अन्नदानाची अभिनव कल्पना मांडली. प्रथम वर्षी माधुकरी सारखे टोपातून अन्न वाढण्यात आले. नंतरच्या काळात  एका छोट्या जागेत दत्तभभक्तांना जेवण वाढले जाऊ लागले. भाऊ स्वतः वाढण्याच काम करीत असत. हळूहळू हे स्वरूप वाढू लागले. सद्यस्थितीत हे अन्नदान मठासमोरील मोठ्या शेतात रितसर मंडप घालून केले जाते. दत्त महाराजही विविध तऱ्हेने आपली उपस्थिती ह्या ठिकाणी दाखवत असतात. सकाळी ८ वाजल्यापासून भक्तांना जेवण वाढण्यास सुरवात केली पाहिजे, असा भाऊनी दंडक घालून दिलेला आहे. त्यासाठी सकाळी भाऊंचे शिष्य सकाळी ३ वाजता उठून जेवण बनवण्यास सुरवात करतात. ज्या टोपामध्ये जेवण शिजवले जाते तो एकेक टोप पन्नास किलोचा असतो. मंडपामध्ये एकाच वेळी हजारभर माणसे जेवायला बसतात. त्यांना वाढायच काम अविरत चालूं असते. सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत हे काम भाऊंचे शिष्य अविश्रांत करत असतात. ह्या काळात अन्नदाना सोबत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. या अंतर्गत गरजूना औषधे वाटप, चष्मा वाटप केले जाते.

पितृपक्ष अन्नदान

माणसाच्या प्रगतीत बऱ्याच वेळा एक मोठा अडथळा असतो तो म्हणजे त्यांच्या पितरांचा अर्धवट राहिलेला प्रवास. ते सतत त्या व्यक्तीला काही अडथळा निर्माण करून आपली व्यवस्था करण्यासाठी सुचवत असतात. याचाच एक भाग म्हणून पितृपक्षात भाऊ महाराजांनी अन्नदान  सुरू केले. संबंधित व्यक्तीच्या, पितरांच्या नावाने संकल्प सोडून, दत्तभक्तांना अन्नदान केलं जातं. ह्याचा थेट फायदा असा होतो की, दत्तभक्ताला जेवु घातल्यामुळे त्या व्यक्तीच्या पितरांना पुढील गती प्राप्त होते. आणि मोक्षासाठी त्यांचा मार्ग मोकळा होतो. अशी कितीतरी गणिते भाऊ महाराजांनी आपल्या शिष्याच्या प्रगतीसाठी मांडली.

  • ऐसें गुरू न जरी भेटती । का गेलो असतो त्या स्थानी । कैसे गाणगापूर कैसी भक्ती । व्यर्थ नरजन्म असता।।
  • खरेच आमुचे नशीब ताठ । भाऊं संगे पडली गाठ । तेणे वळवूनी आम्हा नीट । परमार्थ मार्ग दाविला।।

|| श्री गुरुदेव दत्त ||