माघी अन्नदान

दत्तभक्तीचा प्रसार करता करता, त्या अनुषंगाने येणाऱ्या कार्यातून आपल्या शिष्याना घडवण्याचे कार्य भाऊनी केले होते. तरुणांनी सतत कामात राहावे हे त्यांचे साधे सोपे तत्वज्ञान होते. भाऊंनी वर्षभराच्या कार्यक्रमाची आखणी अशा तऱ्हेने केली होती की कोणाला विचार करायला उसंत मिळू नये. सातत्याने आपला शिष्य देवकार्यात मश्गुल राहिला पाहिजे याची काळजी भाऊंनी घेतली होती. भाऊंचा मानसशास्त्राचा प्रचंड अभ्यास होता. तसेच त्यांची कल्पनाशक्ती अफाट होती. माघ पौर्णिमेला श्रीगुरु निजांनदी गेले त्या दिवसाच औचित्य साधून हजारो भक्त महाराजांच्या भेटीला गाणगापूरला येतात. पंढरपूरची जशी वारी तशी ही गाणगापूरची माघ वारी म्हणायला हरकत नाही. या काळात तशी शेतीची फारशी कामे नसतात. विदर्भ, मराठवाडा, सोलापूर तसेच कर्नाटकातील अनेक गावातील भाविक या वारीला आपल्या कुटुंबाना घेऊन येतात. अधिकतम शेतकरी वर्ग असल्याने सोयीचं आध्यात्म त्यांच्या ठायी नसत. रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून राहतात. नदीत स्नान करतात. माधुकरी मागतात व जशी जमेल तशी देवाची भक्ती करतात. या लोकांमध्ये कित्येक लोक फक्त प्रवासापूरते पैसे सोबत घेऊन आलेले असतात. सर्व भार देवावर. अशा भक्तांना एकवेळ पोटभर अन्न देणं म्हणजे देवाचीच सेवा करणे. भक्तांची सेवा ही महाराजाना अतिप्रिय आहे. या सर्वांचं गणित बसवून त्याच माघी अन्नदान हे नवीन समिकरण भाऊंनी मांडलं. जे दरवर्षी सोडवायच आहे. ज्या प्रमाणे व्यासांनी कठीण ऋचा गणेशास सोडवण्यास दिल्या होत्या. भव्य दिव्य कार्यक्रमाच्या आयोजनाचे कार्य करताना आपोआपच शिष्याची कार्यक्षमता, व्यवहार चातुर्य, कार्यतत्परता, बुद्धिकौशल्य पणास लागणार होतं. आणि हे करता करता नकळत संपूर्ण आयुष्य बद्लुन टाकणारी दत्तसेवा होणार होती.

धन्य धन्य ती माऊली । जी आम्हास लाभली । बहु सुकृताचे देणे ही ते।  दत्तकृपा जाहली ।  

सुरूवातीच्या काळात मठामध्ये एका छोटया जागेत दत्तभक्तांना जेवू घातलं जायचं. भाऊ स्व त: वाढण्याचं काम करीत. असा हा कार्यक्रम आठवडाभर सुरू असतो. पुढे पुढे अन्नदान मोठया प्रमाणात होऊ लागलं. मठाची जागा अपूरी पडू लागली. त्याचवेळेस तेथील एक व्यक्ती मदत करण्यास पुढे आली. मठाच्या समोर ज्यांची एक मोठी शेत जमीन आहे, त्यांचं नाव पाटील. त्यांनी अन्नदान काळात आपली जमीन वापरण्यास परवानगी दिली. किंबहुना दत्तमहाराजांनीच तशी बुध्दी दिली असेल. भाऊंना आनंद झाला. त्यावर्षी श्री. पाटील यांच्या शेत जमिनीवर मोठा मंडप उभारला गेला. मंडप उभारणे हे फार कठीण काम. तेथे पाहिजे जातीचे! त्यासाठी तसे कामगार आणायचे कुठून हा भाऊंच्या समोर प्रश्न उभा राहिला. परंतु भाऊंची तरूण मंडळीही काही कमी नव्हती. कुणालाही ह्या कामाची सवय नाही अथवा कला नाही, तरीही उत्तम कारागीरांना लाजवेल असा मंडप तरूण मंडळींनी हा हा म्हणता उभा केला. भाऊ तर तो मंडप पाहून आनंदून गेले. अन्नदान अगदी उत्तम प्रकारे पार पडले. त्यावेळी दत्तमहाराजांनीही भाऊंना आपली उपfस्थती दाखवून दिली. त्या वर्षापासून मोठया प्रमाणात अन्नदान होऊ लागले. यात सर्व शिष्य अग्रेसर असतात. इतर कित्येकजण जेवण करण्यात गर्क असतात. म्हणजे आठवडाभर कोणीही झोपत नाही. रात्री 3 वाजल्यापासूनच जेवण करण्यास सुरूवात होते. प्रश्न येतो, इतक्या रात्रीपासून जेवणाची तयारी का? तर पहाटे पासूनच भाविकांची संगमावर जाण्यास सुरूवात होते. म्हणून सकाळी 8 वाजल्यापासून भक्तांना जेवण वाढण्यास सुरूवात करायची असा भाऊ महाराजांनी दंडक घालून दिलेला आहे.

जेवण ज्या टोपांमध्ये शिजवलं जातं, तो एकेक टोप पन्नास किलोचा (पन्नास किलो धान्य शिजलं जातं) असतो. तो उचलण्यासाठी ८ – १० जण लागतात. त्यासाठी भाऊंची तरूण मंडळी तत्पर असते. हे कामही ते आनंदाने करीत असतात. हा झाला जेवणाचा भाग. पुढे प्रश्न येतो तो भक्तांना जेवण वाढण्याचा! एवढया मोठया मंडपात (एकाच वेळी हजारभर माणसे जेवायला बसतात.) बसलेल्या भक्तांना वाढणं हेही भारी काम. कारण जेवण वाढणं, म्हणजे कमरेत वाकणं! असं किती वेळा, त्याचा हिशोब नाही. या कामात भाऊ महाराजांचे इतर शिष्य-शिष्यां तत्पर असतात. किती वेळ? सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत. म्हणजे पाच तास हे अविरत कार्य चालू असते. त्यातही एक पंगत उठली की जमिनीवर पडलेलं उष्टे उचलण्यासाठी काही शिष्य तयार असतात. ही सारी कामे सर्व शिष्यवर्ग उत्साहाने करत असतो. त्यात आळस नाही, कामचुकारपणा नाही. सचोटीने, प्राप्त झालेली सेवा अंगीकृत करीत असतात. यात आश्चर्याची गोष्ट अशी, त्या सात दिवसात कुणाचाही चेहऱ्यावर थकवा आल्याचं जाणवत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो तो फक्त आनंद आणि आनंदच!

ह्या कार्यक्रमाची आणखी एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते ती ही की भाऊंच्या देहधर्म त्यागानंतर काकाश्रींच्या कारकीर्दीत अन्नदान अधिकाधिक वाढत चालले आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी मोठया प्रमाणात देणग्याही मिळतात. भक्त स्वत:हून आपला आर्थीक सहभाग देतात. भाऊंना जे अपेक्षित होतं, ते काकाश्रींच्या मार्फत स्वत: भाऊचं हे सर्व करीत आहेत, असंच वाटू लागते. तसेच भाऊंची गाणगापूरात अन्नदानाच्या वेळी मेडीकल कॅम्प करण्याचे स्वप्नही काकांनी पूर्ण केले. अन्नदान काळात पहिले ३ दिवस मोफत आरोग्य तपासणी, औषधे वाटप, नेत्रचिकित्सा शिबीर व गरजूंना चष्मे वाटप केले जाते. याची पूर्ण जबाबदारी डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंदाने उचलेली आहे.