मातृसत्ताक पद्धतीचे द्योतक म्हणून सर्वत्र भारतात अश्विन महिन्यातील नवरात्री या कालखंडात देवीचे नऊ रुपात पूजन केले जाते. या वसुंधरेला आपण माता संबोधतो. कोकणामध्ये मातेला भूमकाय किंवा सातेरी म्हणतात. या मातीच आणि आपलं आई व मुलाच नात आहे. ही वसुंधरा आपल्याला अन्न देते, पाणी देते म्हणूनच या पृथ्वी वर जीवन उमलू शकले. सजीव सृष्टीची निर्मिती होऊ शकली. पंचमहाभूतामध्ये पृथ्वीचं स्थान वेगळं आहे. आपल्या पूर्वजांनि या पंचमहाभूताना दैवत मानलं व त्यांचं पूजन केल. वसुंधरेच्या पूजनासाठी आश्विन महिन्यातील कालखंड ठरविण्यात आला. सर्वदात्री भूमातेच्या रूपाच म्हणजे मृदेच (मातीच) व त्यात अन्नदात्री म्हणून धान्यबीज टाकून मातेचं त्या घटाच्या रुपात पूजन केल जात . यालाच आपण घटस्थापना म्हणतो.
पुरुषाला सहा चक्र असतात व स्त्रियांना नऊ चक्र असतात. तसेच एकमिती ,द्विमिती या प्रमाणे नऊ मिती आहेत असं मानलं गेलं आहे. नवमीतीच अधिष्ठांन मातेच्या नऊ अवतारांकडे दिल गेलं आहे. नवचक्रं धारणे साठी नवचक्राची जागृती करावी लागते. नऊ दिवस उपासना करून नवचक्राची जागृती झाल्यावर मातेच्या नवरूपाचा आशिर्वाद प्राप्त होतो. देवीच्या नऊ रूपाप्रमाणेच पुरुष देवतेच्या शक्ती पासून २७ मातृका निर्माण झाल्या. उदा. ब्रम्हापासून ब्राम्हीनि, विष्णू पासून वैष्णवी इ.या २७ देवीच्या रुपांची २७ केंद्रे आपल्याच शरीरात अस्तित्वात आहेत. पूर्वी शरीरारवर बऱ्याच ठिकाणी गोंदल जायचं. ज्या ठिकाणी गोंदल जात ती शक्ती केंद्र आहेत.अशी २७ शक्ती केंद्र आपल्या शरीरात आहेत. साधनेद्वारे ही सर्व केंद्र जागृत केली जातात.शाक्त पंथामध्ये या साठी काही उपासना सांगितल्या आहेत. ही शक्ति केंद्र जागृत झाल्यावर आपल्याला विविध शक्तींचा अनुभव येऊ लागतो.
सर्व पंथाना सामावून घेण्यासाठी दत्त संप्रदायाचा उदय झाला आहे. भाऊ महाराजानी मानवाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त असणाऱ्या शाक्त पंथातील देवी भक्तीला दत्त भक्ती मध्ये अंगीभूत करवून घेतले. देवी उपासनेतील काही भाग शिष्याना शिकवून, करवून घेतले. वाशिंद मठात नवरात्री उत्सव सुरू केला. घटस्थापना, देवी महात्म्य पारायण, देवीसहस्त्र नामावली पठण, कुंजीका स्तोत्र, अर्गला स्तोत्र पठण, अष्टमीचा चंडी होम, जोगवा- भजन इ. कार्यक्रम सुरू केले. शक्ती स्थानाची ओळख करून दिली. देवी कृपा प्राप्त करून दिली. अष्टमीच्या होमात पूर्णाहुती पूर्वी नारळ वाहताना दोन्ही बाजूला शिष्याकरवी कुंजीका स्तोत्र, अर्गला स्तोत्र व सहस्त्र नामावलीच पठण करण्याची प्रथा सुरू केली. भाऊंनी सुरू केलेली प्रत्येक पद्धत अभिनव होतीच, पण काळाला मागे टाकणारी, अध्यात्मातील नाविन पायंडा पाडणारी होती.
आदिमाया :

परंपरागत वैचारिक बैठक, पगडा, नितीमुल्य, आचारधर्म शिरोधार्य मानने हे आधुनिक पिढीला तितकसं पटणार नाही. किंबहुना प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीत घालून त्याचे मुल्यमापन करण्यात आजच्या युवा पिढीचा कल आहे. तो तितकासा योग्य आहे असे म्हणता येणार नाही. कारण भौतिकशास्राचे नियम आध्यात्मशास्राला लागू पडतीलच असे नाही. उदा. दुस-याच्या मनातील विचार मनसंक्रमाणाद्वारे आपल्याला ओळखता येऊ शकतात हे परामानसशास्राने सिध्दांताद्वारे सिध्द केले आहे. परंतु त्याचे पुरावे मिळू शकत नाही. अध्यात्मशास्राचे हेच आहे. त्याचे अनुभव येतात परंतु त्यांचे विश्लेषण वैज्ञानिक कसोटीवर होईलच असे नाही.
आदीशक्ती`आदीमाया’ या शब्दांमध्येच आदीअनादीत्व लपलेले आहे. आज ज्याला आपण शक्ती (power) हा शब्द वापरतो तो त्या काळानुसार ज्ञानचक्षूंना न समजणा-या परंतु प्रत्येक ठिकाणी त्या शक्तीचा अस्तित्वाचा स्पर्श होत असलेल्या अनुभवामध्ये आहे. आदीऋषींनी असा सिध्दांत मांडला की, `शिव’ हा या सृष्टीचा निर्माण करता असूनही तो या सृष्टीपासून अलिप्त आहे. त्याच्यायोगे निर्माण होणाऱ्या व विश्वाचे कार्यकारण ठरणाऱ्या उर्जाशक्ती प्रदर्शनाला `माया’ असे म्हटले जाते. `शिवलिंग’ हे त्याचे प्रतिक आहे. याच शक्तीला आपण देवी, आई, आदीशक्ती संबोधतो. वैज्ञानिक दृष्टीकोणातून जर याचा अर्थ लावला तर असं म्हणता येईल की, न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन (शिव) हा स्थिर असून इलेक्ट्रॉन (माया) ही त्याभोवती फिरत असते. जे चराचरात भरलेले आहे.

चराचरात अस्तित्वात असलेल्या या शक्तीला आपल्या पूर्वजांनी दैवीक स्वरूप दिले. त्या शक्तीच्या उपासनेचा आचारधर्म निर्माण केला. जेणेकरून ही शक्ती मानवास सहाय्यभूत होईल व त्याचे कल्याण होईल. याच आदीमायेचे पृथ्वी हे तत्व असल्याने भारतात तिला सर्वदूर ब-याच नावाने पूजले जाते. जमिनीला आई म्हणून पूजतात. कारण सर्व सजिवांच्या पोषणासाठी तीच प्रथम कारणीभूत असते. या आदीमायेची उपासना केल्याने अधिक धनधान्य पिकेल व अधिक सुख नांदेल ही भावना. देवीची उपासना केल्याने सुख-समृध्दी, ऐश्वर्य नांदेल हा आजतागायतचा अनुभव आहे. कर्णोपकर्णी गोष्टीवरून उपासना केल्यास त्यात यश येईलच असे नाही. योग्य गुरूंकडून मार्गदर्शन घेतले असता योग्य उपासना होऊ शकते. देवी उपासनामध्ये काही प्रमुख भाग आहेत. वर्षातील अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून दशमी (दसरा) पूर्व नऊ दिवस या उपासनेसाठी अधिक महत्वाचे आहेत. जिच्यापासून या सृष्टीची पूर्नउत्पत्ती होते त्या जननीचे प्रतिक म्हणून प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. या दिवसापासून नऊ दिवस संस्कृत सप्तशती, दुर्गासप्तशती, देवीसप्तशती इ. ग्रंथाचे पारायण करण्याची पध्दत आहे. बसता-उठता एक पारायण, नऊ पारायणे करता येतात. या प्रत्येक दिवशी देवीसहस्रानामावलीचे पठण अथवा श्रीयंत्रावर, देवीमूर्तीवर पठणासहीत कुंकुमार्चन करण्याची उपासना आहे. नऊ दिवसात उपवासालाही तितकेच महत्व आहे. शक्य असल्यास, शरीर साथ देत असल्यास दिवसात एकच फळ खाऊन उपवास करण्याची पध्दत आहे. तसेच एकान्न (एकाच प्रकारचे अन्न) खाऊन उपवास सोडण्याची पध्दत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाबरोबरच उपासना करणे अधिक फलदायी आहे. अष्टमीच्या दिवशी नवचंडी होम, चंडीहोम, शतचंडी होम करावा, त्याचे अनंत फल आहे. होम चालू असताना कुंजिकास्तोत्र पठण करावे. रामायणातील युध्दकाळात श्रीरामाने या नऊ दिवसात देवी उपासना केल्याने प्रत्यक्ष आदीमायेने तेथे प्रकट होऊन श्रीरामाला वरदान दिले होते. भाविकांनी जसे जमेल तसे उपासना करून आदीमातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा व आपले जीवन समृध्द करावे.