श्रीगुरुचरित्र पारायण

सर्व दत्तभक्तांना ‘श्री गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. श्री सरस्वती गंगाधरांनी लिहिलेला ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ नामधारक आणि सिद्ध यांच्यातील संवादाने तयार झालेला असून दत्तभक्तांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून, या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे, याचे अतिशय सुंदर विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म कथन केला आहे. यात अश्वत्थ, औदुंबर, या सारख्या पुरातन वृक्षांचे महत्व विशद केलेले आहे. तसेच, शिवपूजेचे माहात्म्य, रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, अनंत व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आली आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांच्या आशीर्वादनेच ‘श्री गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे. साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.

भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥ अशी त्याची महती आहे. या ग्रंथाचे, दरवर्षी गाणगापूरात, नृसिंहवाडीला, आणि वाशिंदला भाऊ महाराज शिष्य परिवारातर्फे पारायण सप्ताह केले जातात. सदर ग्रंथाचे पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती देणारा हा ग्रंथ आहे, यात दुमत नाही.