उत्सव सोहळा

हिंदू कालगणनेनुसार, प्रत्येक महिना हा एक उत्सव घेऊन येतो. पूर्वीच्या काळी माणसांकडे करमणूकीचे साधन काही नव्हते. त्यामुळे त्यावेळच्या ऋषींनी त्यावेळच्या ऋतुमानानुसार, हवामाननुसार काही सणांची निर्मिती केली. आणि त्याला निसर्गाची जोड दिली. जेणेकरून माणसाला कामातून वेळ काढून थोडा विरंगुळा प्राप्त होइल. एकमेकांशी सवांद वाढेल. त्यायोगे परोपकारपणा वाढेल. आणि अनायासे तो निसर्गाशी सुद्धा एकरूप होईल. त्यामुळेच प्रत्येक महिन्यात एक सण येतो.

भाऊ महाराजांनी ह्या सणांचे औचित्य साधून आपल्या शिष्यवर्गा कडून विविध प्रकारे सण साजरे करता करता, दत्तभक्तीची त्याला जोड दिली. आणि तेच सण वेगळे प्रकारे साजरे करून घेतले. उदाहरणार्थ गुढीपाडव्याला गुढी उभारण्या सोबत सामुदायिक गुरुगीता पठण करण्याची प्रथा घालून दिली. चैत्र नवरात्रीत घटस्थापना आणि चंडीहोम केला जातो. त्यानंतर मे महिन्याच्या सुट्टी मध्ये नृसिंहवाडी यात्रा आयोजित केली.

श्रावणात दत्तगुरूंना रक्षाबंधन, आणि हरिवंश पुराणाचे ग्रंथपठण, जन्माष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी फोडली जाते. गणेश चतुर्थीनिमित्त दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. अथर्वशीर्षच्या आवर्तनाने गणेशाची स्थापना केली जाते. शारदीय नवरात्रात घटस्थापना आणि नवचंडी होम केला जातो. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘खरे सोने वाटणे’ आणि दिवाळीच्या दिवशी गाणगापूर अष्टतीर्थ यात्रेची पद्धत घालून दिली. त्यांनतर कार्तिक पौर्णिमेला पालखी स्वागत, समूह संगम नृत्य आणि वनभोजन केले जाते. दत्तजयांतीला दत जन्मोत्सव आणि नृसिंहजयंती निमित्त दत्तयाग केला जातो. शेवटच्या महिन्यात माघपोर्णिमेनिमित्त माघी अन्नदान आणि महाशिवरात्रीस शिवपूजन केले जाते. असे अनेकविध कार्यक्रम भाऊंनी सुरु करुन आनंद आणि भक्ती अश्या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम साधला आणि आपल्या शिष्याचा परमार्थ सहज सोपा केला.