|| ॐ श्री भानुदासाय नमः ||

|| ॐ श्री भानुदासाय नमः ||


आम्ही फक्त निमित्तमात्र….!!

आपल्याला जर एखाद्या नवीन व्यक्तीला भाऊंबद्दल सांगायचं असेल तर किती वेळ लागेल आणि ते किती परिपूर्ण असेल, याच गणित मांडण कठीण आहे. परंतु एका क्लिकवर ही सर्व माहिती उपलब्ध झाली तर… कर्मधर्म संयोगाने काही व्यक्तींच्या भेटी होत असतात आणि नंतर त्याच घनिष्ट मैत्री मध्ये रूपांतर होत. भाऊ महाराजांकडून आलेल्या समाज सेवेच्या शिकवणीतून व त्यांच्याच कृपेने चालू असलेल्या समाज कार्याच्या अनुषंगाने श्री. सचिन नाटेकर या व्यक्तीची माझ्याशी ओळख झाली. पुढे आम्ही बरीच कामे एकत्रितपणे केली. एका नाथपंथीयांचे तपस्थान असलेले  नागनाथ  खंडाळा घाटातील दुर्गम भागात वसलेल्या दुर्लक्षित गावाची माहिती आम्हाला मिळाली. सदगुरू भाऊ महाराजांच्या जयंती निमित्त गावातील लोकांना मिष्टांन भोजन, मेडिकल कॅम्प असा जंगी कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी भाऊ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सर्वांनी केले. परंतु सचिन यांनी नमस्कार करताना भाऊंच्या प्रतिमेवरचे फूल खाली पडले, हे सौ.जान्हवी चव्हाण यांनी अचूक टिपले होते. हा त्यांच्या कडून नक्कीच काहीतरी मोठे काम होणार याचा शुभसंकेत होता. या दिवसापासून त्या विभागातील समाज कार्याला सुरवात झाली. या कार्याच्या दरम्यान अनेक उच्च शिक्षीत तरुण, डॉक्टर, समाजसेवक, शिक्षक आम्हाला नकळत जोडले गेले. या सर्वांना आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या भाऊ महाराजांबद्दल तसेच त्यांच्या शिष्यांबद्दल नेहमीच अनामिक कुतूहल वाटायच.

आणि एक निमित्त घडल.. एखादी मोठी आग पेटण्यासाठी छोटीशी ठिणगी सुद्धा पुरेशी असते. काही महिन्यापूर्वी कोणी एका शिष्याने वॉट्सऍप ग्रुपवर भाऊंच्या प्रवचनाच्या क्लिप टाकल्या होत्या. सचिन याना भाऊंबद्दल आणखी कळावे, या उद्देशाने  सौ. जान्हवी चव्हाण यांनी सर्व क्लिप सचिन यांना  पाठविल्या. त्या क्लिप ऐकल्यावर भाऊंची वेबसाईट असावी अशी कल्पना त्यांना सुचली. त्यांनी मला फोन करून कल्पना सांगितली. मला ती कल्पना फारच छान वाटली. परंतु वेबसाइटच्या बाबतीत माझ ज्ञान तस तूटपुंज होत. मग ही वेबसाइट फक्त भाऊंवर असावी, असा विचार पुढे आला. आम्ही दोघे कामाला लागलो. लॉकडाऊनच्या काळात आपल्या कडून काहीच सेवा होत नाही आहे, याची मनात रुखरुख होती. परंतु वेबसाईटच्या माध्यमातून भाऊंच एक मोठ काम आपल्या कडून होणार, या विचाराने मनात अतीव  आंनद व प्रचंड ऊर्जा निर्माण झाली.

प्रथम आम्ही साइटचा आराखडा तयार केला. भाऊंची पूर्ण माहिती, त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य, एकाच ठिकाणी संकलित व्हाव्या असा विचार या मागे होता. त्यानुसार २७ टॅबची सूची आम्ही तयार केली होती. सुरवातीला आम्ही दोघच यावर काम करीत होतो. हळूहळू कामाच स्वरूप वाढत गेल व आमच्या लक्षात आल हे काम फार मोठ होणार आहे. प्रथम आम्ही ही साइट प्रायोगिक तत्वावर बनावायची अस ठरवल होत. जर परवानगी मिळाली तरच पुढील काम करायच असा विचार होता. पण भाऊंची तशी ईच्छा नसावी. कारण कर्ते करविते भाऊच होते. हे काम प्रायोगिक तत्वावर बनवताच येणार नाही हे आमच्या लक्षात आल. भाऊंच नाव घेऊन जस काम होईल तस करत जाव अस ठरविल. ही संकल्पना आम्ही श्री. राऊत काका यांच्या मार्फत सदगुरु काकाश्री यांच्या पर्यंत पोहोचविली. त्यांनी आशीर्वाद कळविला. कार्याला बळ मिळाले. भाऊ महाराजांच्या लिलेचा प्रत्यय येऊ लागला. दररोज नवीन विषय आठवायचा. नवनवीन टॅब वाढत चालले होते.

एका दोघांच हे काम नाही हे लक्षात आल्यावर काही गुरुबंधूंच सहकार्य घेतल. श्री. संजय धुरी यांच्याकडे काही लेख लिहीण्याचे काम दिले. भाऊंच्या कृपेने त्यांनी कधीही न केलेलं काम फार सुंदरपणे करून दाखविले. जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा ते आपल्याकडून अविश्वसनिय कामे करून घेतात. श्री. अविनाश राणे यांना टायपिंगचे काम दिले. भाऊंच कार्य म्हटल्यावर तेही अनामिक ऊर्जेने कामाला लागले. व्हीडियो, गाण्याचे रेकॉर्डिंग, ऑडियो रेकॉर्डिंगचे सर्व काम श्री. विशाल खोत यांनी आपल्या खांद्यावर घेतलं. नवनवीन प्रयोग केले. माहीत नसलेल्या अनेक गोष्टी ते सहज शिकून गेले. यामध्ये त्यांच्या काही मित्रानी सुध्दा मदत केली. सर्व जण कामाला लागले. सचिन यांच काम आम्हा सर्वांपेक्षा जास्त होत, कारण आम्ही जे लिहायचो किंवा बनवायचो ते सर्व साईट वर लोड करण्याचे, डिझाईन करण्याचे, साज चढवण्याचे काम फक्त सचिन यांच होत. त्यासाठी श्री प्रफुल सावंत यांनीही मोलाची मदत केली. कारण वेबसाइट मधील तज्ञ व्यक्तीच हे किचकट काम करू शकते. त्यांना सुचलेल्या कल्पनेला योग्य न्याय देण्यासाठी सचिन दर दिवशी अंदाजे ५/६ तास काम करीत होते. तसा काहीही संबंध नसताना फक्त ऐकीव माहितीच्या आधारावर एकही रुपया न घेता एवढं मोठं काम करणं हे अविश्वसनिय आहे. लॉक डाऊनचा काळ आपण घरात बसून काढणार याची मनात डाचत असणारी सल भाऊ महाराजांनी आपल्या कृपेने  काढून टाकली. आयुष्यातील खूप सुंदर कार्य आम्हा सर्वांकडून करवून घेतलं. हे गुरुकृपेच ऋण न फेडता येण्यासारखं आहे.

दत्तभक्तीच प्रसार माध्यम राबविताना सद्गुरू भाऊ महाराजांनी आपल्या शिष्या करवी अनेक पुस्तकें लिहून घेतली. क्षुल्लक किमतीत त्याचे वाटप तळागाळात केलं. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती पर्यंत दत्तभक्ती पोहचेल. गुरू कार्याचा प्रसार करावा हे प्रत्येक शिष्याचे आद्यकर्तव्य आहे. सदगुरु भाऊ महाराज हे दत्तसंप्रदायातील अलौकिक व्यक्तीमत्व. त्यांच्या सकल लीलेच एकत्रिकरण करून एकाच ठिकाणी उपलब्ध होतील असा मार्ग म्हणजे वेबसाईट. हे आधुनिक जगाच प्रसार माध्यम आहे. या साईटच्या माध्यमातून भाऊंनी केलेले दत्तभक्तीचे कार्य, वेगळ्या पद्धतीने सुरु केलेले सण, उत्सव तसेच केलेले सर्व समाजकार्य याचा उलगडा होणार आहे. समाज प्रबोधन, इतिहास, मंत्र शास्त्र, विज्ञान, आधुनिकता तसेच दैवी विषयावरील भाऊंनी मांडलेलेे विचार येथे अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे भक्तगण आणि शिष्य तो वारसा आजतागायत जपत आहेत. या सर्व उपक्रमांची कार्यक्रमाची विस्तृत अशी माहिती, फोटोज तसेच व्हिडिओज येथे टाकण्यात आले आहेत. त्या मागील भाऊंचे विचार मांडण्यात आले आहेत.

या साईटच्या माध्यमातून भाऊ महाराज हे कोण होते, त्यांचे कार्य काय होते त्यासंदर्भातील लिखाण, त्यांचे हस्तलिखित, फोटोज, व्हिडिओज आणि त्यांच्या जुन्या आठवणी अशी सर्व माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला २७ पेजपासून सुरुवात केली होती, आता जवळपास ११८ पेज झाले आहेत, आणि अजून ही माहिती वाढत चालली आहे. या साईट मध्ये जवळपास १२००+ फोटोस, ६०+ व्हिडीओज आणि ५०+ डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे. साईटची एकूण क्षमता १२ जीबीच्या वरती गेली आहे आणि ती अजून वाढत आहे. भाऊंची प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी पहाता यावी, अभ्यासता यावी, आकलन करता यावी, सर्वदूर याचा प्रसार व्हावा, यासाठी आमच्या कडून भाऊंनी करवून घेतलेला एक प्रयत्न…

श्री समीर एकनाथ चव्हाण


श्री गुरुदेव दत्त

कोरोनाचा काळ चालूं होता. लॉकडाऊन मुळे सर्व आयुष्य थांबल्यासारखं वाटत होत. जॉबच, पगाराच टेन्शन होत. गावी जायचं की इथेच थांबायचे, यावर एकमत होत नव्हतं. अशाच एका संध्याकाळी श्री. समीर चव्हाण यांचा फोन आला. त्यानी प्रायोगिक तत्वावर भाऊंची वेबसाईटच काम चालु केलं होतं. संबंधित माहीती सांगून त्यावर काम करण्यासाठी विचारणा केली. भाऊंचे कार्य आणि त्यातही काही अनोखे असल्याने मीही होकार कळवला. पण मुळात माझा हा प्रांत नाही, असे मी समीरला सांगितले. त्याने मला लेख लिहण्यासाठी लागणारी आणि इतर काही मदत करायला सांगितली.

भाऊंचे नाव घेऊन लेखाला सुरवात केली. आतापर्यंतच्या प्रवासात भाऊंबद्दल ऐकलेली माहिती, त्यांच्याबद्दल वाचलेली पुस्तके, भानुदास चरित्रामृत, गोळवणचा राणा, विविध ग्रंथ पारायणे, या सर्वांच्या संदर्भाने लेख लिहायला सुरुवात केली. समीर योग्य तिथे काटछाट, सजावट करून ते लेख पूर्णत्वास नेत होते. तटस्थ लिखाणा संबंधित बऱ्याच गोष्टी समीर यांनी शिकवल्या. वेळोवेळी त्यात त्यानुसार बदल करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू बरेच लेख विविध विषयांशी संबंधित लिहून झाले. त्यातली मजा येऊ लागली. विषयासंबंधीत नवनवीन रचना सुचू लागल्या. एका अनोळख्या प्रांतातील हा प्रवास सुरु झाला होता. पण खोल अंतर्मनात ही गोष्ट घट्ट माहीत होती, की हे सर्व भाऊच करवून घेत आहेत. माझ्यातला हा बदल माझ्या पत्नीला ही जाणवला. तिलाही तेच सांगितले कर्ता करविता फक्त सदगुरु भाऊ महाराजच…

याशिवाय श्री. सचिन नाटेकर, यांनी वेबसाईटमधील बऱ्याच टेक्निकल बाबी सांगितल्या. एक साईट बनवणे, किती कलाकुसरीचे आणि किचकट काम आहे, हे प्रथमच जाणवले. त्यांच्याच मदतीने मी आणि अविनाशने मिळून ऑनलाईन प्रूफ रिडींगचेही काम केले. काहीही असो, संकल्पना सुचवण्यापासून, ती पूर्णत्वास नेण्यापर्यंत, यात काम करणाऱ्या प्रत्येकाला भाऊंचा सहवास जाणवत होता. यातील प्रत्येक गोष्ट भाऊ घडवून घेत आहेत, याचा पावलोपावली अनुभव येत होता. प्रत्येकजण भाऊमय झाला होता. सगळंच चमत्कारिक घडत होतं. असो, शेवटी हे या पद्धतीने घडवण्याची इच्छा सुद्धा भाऊंचीच. आम्ही केवळ निमित्तमात्रच. म्ह्णूनच हे सर्वार्थाने श्रीसदगुरुभाऊनाथार्पणमस्तू…

श्री संजय जयराम धुरी


परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णची झाले! या ओळींचा प्रत्यय मला या कामामध्ये आला  अर्थात ह्या कामाला श्री समीर चव्हाण यांच्या एका फोन नंतर सुरुवात झाली. मी मुळात भाऊ महाराज परिवारामधला भजन प्रमुख, परंतु समीरने व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही काम करायचं असं सांगितल्या नंतर सुरवातीला थोडीशी भीती वाटली की ऑडिओ जमा करून देऊ शकतो पण व्हिडिओ कसे करणार मला त्यातली काहीच माहिती नाही.

कोणाकडून सॉफ्टवेअर घ्यायचं कुठलं घ्यायचं याबद्दल काहीच विचार नव्हता मग आमचे सहकारी ज्यांच्या इच्छेने ही वेब साईट खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ते आमचे श्री सचिन नाटेकर यांनी काही सॉफ्टवेअर मला सुचवले, ते मी अमलात आणले. तसेच विडिओसाठी मी माझे मित्र श्री विजय पाटील व ऑडिओसाठी श्री प्रशांत कदम यांची मदत घेतली. नंतर मी त्या सगळ्या गोष्टी लॅपटॉपमध्ये डाउनलोड केल्या आणि मग त्याच्या वरती खेळायला सुरुवात केली. अशा पद्धतीने दोन्ही सॉफ्टवेअर मी कधी शिकलो आणि या सगळ्या गोष्टी मला कशा काय अवगत होत गेल्या माझं मलाच कळलं नाही. आणि भाऊंच्या आशीर्वादाने ते सहज शक्य होत गेलं. माणसांची मदत मिळत गेली. हवे असलेले फोटो, विडिओ मिळत गेले. आणि काम खूपच सहज होत गेले .लॉकडाऊन कळलाच नाही. अडचणी आल्या परंतु त्या वरती मार्गही भाऊंनी सुचवले. सर्वांना काही ना काही अडचणी आल्या पण त्यावर विचार विनिमय करून, चर्चा करून त्यावर तोडगा काढून काम पुढे सरकायच. पण एक सांगतो, भाऊंचा सहवास पदोपदी जाणवत होता. खरच ते पदोपदी होते म्हणून एवढं काम आमच्या हातून घडलं. तरीही ज्यांनी कोणी जाणते अजाणतेपणी मदत केली त्या सर्वांचे आभार…

श्री विशाल प्रल्हाद खोत


आम्ही फक्त निमित्तमात्र..!!

एक दिवस मला गुरुबंधू श्री समीर चव्हाण यांचा फोन आला. त्यांनी मला ही वेबसाईटची संकल्पना सांगितली आणि काम करण्यासंबंधी विचारणा केली. मला कल्पना खूपच भावली. मी समीरला लगोलग माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या लॉकडाऊनच्या काळात हातात काहीच काम नव्हते. त्यामुळे, मन खूप विचलित होत असे. एका विचित्र मानसिक परिस्थितीतुन सगळेचजण चालले होते. पण भाऊंनी या कामासाठी माझी निवड केली. अनायसे हे अक्षरजुळवणीचे काम मिळाले. समीर याने काही लेख लिहिलेले होते. ते त्यांनी मला टाईप करून देण्यास सांगितले. मी हे लेख टाईप करण्यास सुरुवात केली, तर प्रत्येक लेखात मन गुंतुन जायचे. श्री समीर चव्हाण यांच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे, ह्या सर्व घटना आताच चालू आहेत, असा एक वेगळाच भास होत असे. माझ्या अनुपस्थितीत घडलेल्या घटना, विशेषत: पिंपळेश्वर दत्त मंदिर, गाणगापूर मठ उभारणी, वाशिंद मठ उभारणीचे प्रसंग, पुनः नव्याने माझ्यासमोर घडत होत्या. भाऊ मला त्यांचा साक्षीदार बनवत होते.

या लेखाचे टाइपिंग करताना मला भाऊ महाराजांविषयीची नवनवीन माहिती मिळत गेली. टाइपिंगचे काम करण्यास एकदा सुरुवात केली की भाऊ ते काम लीलया माझ्याकडून, लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे. एक वेगळाच स्पीड मिळायचा. साईटवर काम करणाऱ्या, सर्वांनाच माझ्या या टाइपिंग स्पीडचे नवल वाटले. त्यांनी माझे भरभरून कौतुक केले. पण या स्पीडने भाऊच हे कार्य करत आहेत, याची मला खात्री पटली. या निराशाजनक वातावरणात भाऊंविषयीची माहिती वाचणे, टाईप करणे, साईट पाहणे, संकल्पना सुचवणे, यामुळे मनात एक नवसंजीवनी निर्माण झाली. हा खडतर काळ खऱ्या अर्थाने, त्यांच्याच कृपेने, या अनोख्या आधुनिक कार्यास लागला. घडलेले कार्य पाहिल्यावर, आज खोलवर जाणवतं की आमची निवड झाली हेच आमच परमभाग्य. बाकी आम्ही केवळ निमित्तमात्रच. सदगुरु श्री भाऊ महाराज की जय..!!!!

श्री अविनाश शंकर राणे


ही वेबसाईट होणं ही काळाची गरज आहे. आता मीडियाच एक असं माध्यम आहे, ज्यामूळे खुप कमी वेळात, किंवा काही क्षणात तुम्हाला एखाद्या विषयाची पूर्ण माहिती मिळुन जाते. आणि पुढच्या काळात हेच माध्यम अजून विकसीत होणार आहे. ‘भाऊ’ हे सर्वसामान्य विचार सरणीचे नव्हतेच ते नेहमी काळाच्या पुढे जाऊन विचार करत. त्यांना या सर्व गोष्टी ज्ञात होत्या. म्हणूनच त्यांनी या वेबसाईटची निर्मिती करवून घेतली. या वेबसाईटवर काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही भाऊंन कडून आधीच निवडली गेली होती. याची सुरुवात नागनाथच्या मेडिकल कॅम्प पासून झाली. तिथे भाऊंच्या तसबिरीला नमस्कार करताना श्री.सचिन नाटेकर यांच्या डोक्यावर पडलेलं आशीर्वादपर फुल या गोष्टीची साक्ष देते की हीच व्यक्ती पुढे भाऊंच्या वेबसाईटची पायभरणी करणार आहे. त्यांना सर्व माहिती मिळावी ह्याची जबाबदारी भाऊंनी श्री समीर चव्हाण यांच्या खांद्यावर टाकली. समीर हे भाऊंचे शिष्य असून त्यांच्या बद्दलच्या सर्व  इतिहासाचे साक्षीदार आहेत.

वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रयोजन भाऊंनी आधीच करून ठेवले होते. काम चालू असताना बऱ्याचदा असे वाटले होते की आता पुढे हे काम बंद होईल. पण सदगुरुंची इच्छा असेल तर अशक्य ही शक्य होते. आणि तसेच झाले. वेळोवेळी त्यांनी मार्ग दाखवून अडचणीतून बाहेर काढले. एकामागोमाग एक शिष्यगण या कार्याला जोडले गेले. आणि त्यातूनच भाऊंच्या आयुष्यातले एक सोनेरी पान जगासमोर ठेवता आले. अर्थात ही भाऊंची निवड होती म्हणूनच हे सर्व शक्य झालं. या वेबसाईटवर काम करता करता प्रत्येक जण भाऊंबद्दलचे लेख वाचून भावुक झाले होते. गुरू शिष्य ही नाती जन्मोजन्मीची असतात. त्यासाठी कुठल्याही सोपस्काराची गरज नसते. हे एक अस नात आहे जे चुंबकीय शक्ती प्रमाणे गुरुंकडून शिष्याकडे किंवा शिष्याकडून गुरुंकडे आकर्षित होत असत. जोडलं जात असत. त्यासाठी अश्या किती तरी घटना फक्त निमित्त मात्र असतात. या कार्याला श्री.संजय धुरी, श्री.विशाल खोत आणि श्री.अविनाश राणे यांची साथ मिळाली. या प्रत्येकाचे या कालखंडात भाऊंचे आलेले अनुभव अधोरेखित करण्याजोगे आहेत. मी सचिन नाटेकर यांना भाऊंच्या क्लीप पाठवणं, त्या पाहून त्यांना या वेबसाईट ची निर्मिती सुचिवणे हा निव्वळ योगायोग नसून ही भाऊंनी रचविलेली योजना असावी. त्याशिवाय इतकी अविश्वसनीय वेबसाईट निर्माण होण शक्य नाही. भाऊंच्या या लिलेसाठी आम्हा सर्वांकडून मला इतकंच म्हणावंस वाटतं की,

योजलेला डाव हा सारा, रचविले तुम्हीच सर्व शास्त्र

आयुष्याच्या या सारीपाठावर ,आम्ही फक्त निमित्त मात्र

जाणवू लागला भास तुमचा, खुलली अंतरंगातील गात्र

घडू लागले अघटीत हे सारे, आम्ही फक्त निमित्त मात्र

लेखणीत ही जादु घडली, अवगत झाली सर्व स्तोत्र

जगकल्याणाच्या कार्यासाठी,आम्ही फक्त निमित्तमात्र

आम्ही फक्त निमित्त मात्र..!!!!

सौ.जान्हवी समीर चव्हाण


संपादक / संकलन  – श्री. समीर एकनाथ चव्हाण

संकल्पना / सादरीकरण श्री. सचिन रामचंद्र नाटेकर

साईट डेव्हलपमेंट –  श्री. प्रफुल शशिकांत सावंत

लेखन श्री. समीर ए. चव्हाण, श्री. संजय जयराम धुरी

व्हिडिओ डेव्हलपिंगश्री. विशाल प्रल्हाद खोत

अक्षरजुळवणीश्री. अविनाश शंकर राणे.


|| ॐ श्री भानुदासाय नमः ||